Kumar Ketkar On Maharashtra NCP Crisis : अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. या राजकीय घडामोडींवर काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि लोकसत्ताचे माजी संपादक कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. ईडी-सीबीयला घाबरुन जे भेकड शरद पवारांना सोडून गेले त्यांची गत पूर्वीच्या सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय होणार हे स्पष्ट आहे," असं कुमार केतकर म्हणाले. कुमार केतकर यांनी एबीपी माझा डिजिटलला राज्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. 


कुमार केतकर म्हणाले की, "राष्ट्रवादीतील पंचमस्तंभीयांचे बंड फारसे अनपेक्षित म्हणता येणार नाही. त्यासाठी शिवकालीन इतिहासाचे संदर्भ असले तरी ते देण्याचीही गरज नाही. त्यांची नाळ नरेंद्र मोदींच्या फॅसिस्ट राजकारणाशी जुळते हे 2014 पासूनच दिसले आहे. एका अर्थाने झाले ते बरे झाले. आता काँग्रेस खरोखरच स्वबळावर लढू शकेल वा शक्य झाल्यास उद्धव ठाकरेंबरोबर समझोता करु शकेल. असेही म्हणता येईल की शरद पवारही त्यांच्या पक्षाच्या शृंखलामधून मुक्त झाले आहेत. पवार समर्थकांना आता 'तळ्यात मळ्यात' राहण्याचे सोईचे राजकारण करता येणार नाही. 


'काँग्रेसने आत्मविश्वासाने, स्वबळाने पक्ष समर्थ करायला हवा'


इंदिरा गांधींनी 1969 मध्ये त्यांच्या पक्षातल्या पंचमस्तंभीयांना असेच आव्हान देऊन नामोहरम केले होते. ईडी-सीबीयला घाबरुन जे भेकड शरद पवारांना सोडून गेले त्यांची गत पूर्वीच्या सिंडिकेटसारखीच दयनीय आणि दुर्लक्षणीय होणार हे स्पष्ट आहे. या मंडळींच्या जाण्याने मविआ संपली पण फॅसिझमविरोधी शक्ती मात्र बळकट होऊ शकतील. कपट कारस्थानांचे मोदी-शाहांचे राजकारण भले त्यांच्या भक्तांना 'मास्टरस्ट्रोक' वाटत असेल पण या मास्टरस्ट्रोकर्सचा त्रिफळा कसा उडतो हे आपण अनेकदा पाहिले आहे. आता काँग्रेसने पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्वबळाने, राहुल गांधींप्रमाणे लोकांमध्ये जाऊन पक्ष समर्थ करायला हवा, आता हवा अधिक स्वच्छ झाली आहे.


अजित पवारांसह नऊ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश


महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै 2023 रोजी आणखी एक बंड पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली राजकीय भूकंप झाला आहे. मागच्या वेळी भाजपकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना टार्गेट होती, तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस राहिली. भाजपला अखेर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात यश आलं आहे. अजित पवार यांनी आमदारांना सोबत घेऊन भाजपशी हातमिळवणी केली. अजित पवार याच्यासह राष्ट्रवादीकडून नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.


हेही वाचा