नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress MLA) काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर  (Hiraman Khoskar) यांनी या सर्व प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसनं सांगितल्या प्रमाणं मतदान केलं असल्याचं हिरामण खोसकर यांनी म्हटलं. 


गेल्या दोन दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून सुरु असलेली बदनामी थांबली पाहिजे.  वरिष्ठांनी या प्रकरणाची दखल घेऊन बदनामी थांबवली पाहिजे, असं हिरामण खोसकर म्हणाले. कोणत्या आमदारानं कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे ठरलं होतं. काँग्रेसची  7 मतं मिलिंद नार्वेकर यांना द्यायची आणि उरलेली मतं शेकापच्या जयंत पाटील यांना द्यायचं ठरलं होतं. त्यापद्धतीनं नाना पटोले, कैलास गोरंट्याल आम्ही सगळे गेलो. एकत्र गेलो आणि मतदान केलं. उद्धव ठाकरे यांचे 16 आणि आमचे 7 अशी 23 मतं होतात. एक मतं कुणाचं फुटलं हे कोर्टाकडून आदेश घेऊन चेक करा, असं हिरामण खोसकर म्हणाले. 


नाशिक इगतपुरी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा विधान परिषद मतदानावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले, ईतर पक्षश्रेष्ठी आणि मीडियाने माझी बदनामी थांबवावी, असं आवाहन हिरामण खोसकर यांनी केलं.   मी विधानपरिषद निवडणुकीत कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, असंही हिरामण खोसकर म्हणाले. 



मतदान कुणाला केलं? हिरामण खोसकरांनी सगळं सांगून टाकलं


पहिली पसंती मिलिंद नार्वेकर, दुसरी जयंत पाटील आणि तिसरी प्रज्ञा सातव असे मी मतदान केले आहे. मी व्यवस्थित मतदान केलेलं आहे. माझी बदनामी सुरु आहे  ती चुकीची आहे. जे काही आमदार फुटलेत त्यांच्यावर कारवाई करावी. जे फुटलेत त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांची ताकद नाही, असंही खोसकर यांनी म्हटलं. 
 
माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर अन्याय केला जातोय. चौकशी करा मात्र पहिले माझे मतदान चेक करून बघा, असं हिरामण खोसकर म्हणाले.  भले माझी पक्षातून हकालपट्टी करा पण त्या पूर्वी माझे मतदान चेक करा, असं आवाहन हिरामण खोसकर यांनी केलं आहे. 


विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसकडे 37 मतं होती. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली आहेत. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले, महाराष्ट्रातील जनता आमच्या बरोबर आहे.पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे.पक्षातील बेईमान आम्हाला शोधून काढायचे होते म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली होती. आता पक्षातील कचरा साफ होईल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. 


संबंधित बातम्या : 



आमदार कैलास गोरंट्याल हे पक्षनिष्ठ, बेईमान शोधण्यासाठी निवडणूक लढवली, आता पक्षातील कचरा साफ होईल : विजय वडेट्टीवार