नागपूर: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. हा निर्णय मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी घेत असल्याचेही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली. वाघाची इतक्या लवकर शेळी होईल, असं वाटलं नव्हतं, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजपसोबत जाणार, हे मराठी जनतेला कळाले होते. वाघाची शेळी झाली. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या  मतांवर परिणाम होणार नाही. कदाचित राज ठाकरेंची एखादी नस दाबली असेल. 'दाल मे कुछ तो काला है'. राज ठाकरे आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले ,हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवारांच्या या टीकेनंतर आता मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे आता पाहावे लागेल.


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?


राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेत, हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 


आणखी वाचा


यावेळीही लोकसभा नाहीच, विधानसभेची तयारी सुरू करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना; राज ठाकरेंची मोठी घोषणा