Congress Bharat Jodo Yatra: भारतातील प्रत्येक नागरिकाला जोडण्यासाठी काँग्रेस पक्ष उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. जगात प्रेम आणि बंधुता पसरवणे हा या प्रवासाचा उद्देश असल्याचं काँग्रेस (Congress) पक्षाने सांगितलं आहे. म्हणूनच याला  भारत जोडो यात्रा असे नाव देण्यात आले आहे. हा प्रवास एकतेची ताकद दाखवण्यासाठी, एकसोबत चालत भारत घडवण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.


पक्षाने सांगितलं आहे के, राहुल गांधी उद्या म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करणार आहेत. सकाळी सात वाजता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा होणार आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील.


असा असेल पहिल्या दिवसाचा कार्यक्रम 


सकाळी सात वाजता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभा होणार आहे. यानंतर दुपारी 3.05 वाजता तिरुवल्लुवर स्मारकाला भेट दिली जाईल. दुपारी 3:25 वाजता विवेकानंद स्मारक, दुपारी 3:50 वाजता कामराज स्मारकाला भेट देतील. त्यानंतर दुपारी 4.10 वाजता महात्मा गांधी मंडपम येथे कार्यक्रम होणार आहे. यानंतर भारत जोडो यात्रा पुढे नेण्यात येईल.


दररोज 25 किलोमीटर पदयात्रा होणार 


भारत जोडो यात्रेत दररोज 25 किमीचा पायी प्रवास असेल आणि 3500 किमीचा प्रवास 150 दिवसांत पूर्ण केला जाईल. यादरम्यान अनेक ठिकाणी चौकसभा आणि सर्वसाधारण सभांचे आयोजनही केले जाणार आहे. देशाला जोडण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. जेव्हा ही यात्रा निघेल तेव्हा इतिहास लिहिला जाईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. उद्यापासून कन्याकुमारीमध्ये 3500 किमी लांबीची भारत जोडी यात्रा सुरू होत आहे.


दरम्यान, काँग्रेसची (congress) भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध (BJP) वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणे, तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण आणि चेहरा असलेले राहुल गांधी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून ही काँग्रेस पुढे करत असल्याची चर्चा आहे.