Opposition Unity:  देशात विरोधी पक्ष 2024 ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपविरुद्ध वातारण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच 25 सप्टेंबर रोजी दिवंगत जननायक चौधरी देवी लाल (Devi Lal Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात होणाऱ्या सन्मान दिन रॅलीमध्ये अनेक विरोधी पक्ष नेते एकत्रित दिसू शकतात. यात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar), तेजस्वी यादव (Tejashwi Yadav), फारुख अब्दुल्ला, आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) फतेहाबाद येथे आयएनएलडी आयोजित केलेल्या सन्मान दिन रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चौटाला यांना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर बोलण्यास सांगितले. यादरम्यान त्यांनी 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सन्मान दिन रॅलीचे आमंत्रण दिले. जे तेजस्वी यांनी स्वीकारले. दिवंगत जननायक देवी लाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सन्मान दिन रॅलीसाठी ते स्वतः चंद्राबाबू नायडू, फारूख अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करणार आहेत.


विरोधी पक्षातील नेत्यांची नितीश कुमार घेत आहे भेट 


याआधी मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी ओम प्रकाश चौटाला यांची त्यांच्या गुरुग्राम निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत जनता दलचे (यू) सरचिटणीस केसी त्यागी आणि आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी हे देखील उपस्थित होते. यावेळी देशाच्या व राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच तिसरी आघाडी मजबूत करण्याबाबत देखील चर्चा झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.


सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे : ओपी चौटाला
 
ओपी चौटाला म्हणाले की, लोक भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ लागले आहे. ते म्हणाले की, आता सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते. आता नितीश कुमार एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर तिसर्‍या आघाडी बनवण्याची मोहीम अधिक तीव्र झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ऑगस्टमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सरदार प्रकाशसिंह बादल यांचीही भेट घेतली होती. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याशीही तिसर्‍या आघाडीबाबत चर्चा होणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.