नागपूर : राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांना, रेशनकार्ड (Ration card) धारकांना सण-उत्सवात दिलासा देण्यासाठी आनंदाचा शिधा ही नवसंकल्पना सुरू केली. 100 रुपयांत डाळ, साखर, तेलासह 4 पदार्थांचे वाटप रेशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून होऊ लागले. त्यामुळे, महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांच्या घरी सणाच्या अगोदर हा आनंदाचा शिधा (Anandacha shiddha) पोहोचू लागला आहे. मात्र, सरकारकडून घोषणा होते, पण नियोजन होत नाही. त्यामुळेच, अद्यापही लाखो नागरिकांच्या घरी आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. गणेशोत्सव सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पांनंतर गौराईचंही आगमन झालं, आपल्या घरी आलेल्या गौराईला निरोपही देण्यात आला. मात्र, अद्यापही जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलाच नसल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे. अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली, तसेच आनंदाच्या शिधामधून देण्यात येणारं साहित्य हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 


राज्य सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना समजलेलं जाणाऱ्या "आनंदाचा शिधा" संदर्भात काँग्रेस पक्षाने गंभीर आरोप केले आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान आनंदाचा शिधा 1 कोटी 56 लाख गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचायला हवा होता. मात्र, गणेशोत्सव संपत आला तरी अजून राज्यातील बहुतांशी गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला आहे, त्या ठिकाणीही शिधामधील साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून वजनामध्येही कमी साहित्य दिले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.


डाळ निकृष्ट, साखर पिवळसर


आनंदाचा शिधाच्या पिशवीमध्ये दिल्या जाणारी डाळ निकृष्ट प्रतीच्या आहेत, तर या पिशवीतून देण्यात आलेली साखरही पांढरी ऐवजी पिवळसर दिसून येते. तेलाची डेन्सिटी कमी असून प्रत्येक पॉकेटमध्ये दहा ग्रॅम एवढ्या तेलाची चोरी असल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केला. त्यामुळे, एका बाजूला लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांचं हित साधणारं आमचं सरकार असल्याचा दावा केला जातोय. मात्र, महायुतीचे नेते आनंदाचा शिधाच्या बाबतीत महिलां भगिनींची व सर्वसामान्यांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप लोंढे यांनी केले आहे. लोंढे यांनी पत्रका परिषदेत डाळीचे पाकीट फोडून दाखवले असून तेलाचा पुडाही त्यांनी समोर ठेवला होता. त्यामुळे, आता अतुल लोंढे यांच्या आरोपाला राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आनंदाचा शिधा अद्यापही लाखो नागरिकांपर्यंत पोहोचल नसेल तर सरकार व पुरवठा विभाग नेमकं काय करतंय, हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 


हेही वाचा


मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'