Complaint Against Navneet Kaur : मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवार आणि अमरावतीच्या (Amravti) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. खासदार नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये (Hyderabad) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणातील (Telangana) सभेत बोलताना नवनीत कौर राणांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे आमदार बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांना थेट इशारा दिलेला. यावेळी त्यांनी पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. तसेच, काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, असंही नवनीत राणा म्हणालेल्या. निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी नवनीत राणांच्या प्रतिक्रियेची गांभीर्यानं दखल घेतली असून अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शादनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


 नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. आता या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणालेल्या. राणांच्या याच वक्तव्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


"मैं मुर्गी का बच्चा हूँ..."; असदुद्दीन ओवैसींचं नवनीत राणांना प्रतिआव्हान 


नवनीत राणांच्या 15 सेकंदांच्या वक्तव्यानंतर आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीही राणांना प्रतिआव्हान दिलं. ओवैसींनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ओवैसी म्हणाले की, "छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) तोफ आहे, तोफ... तो कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही. त्याला समजावू शकणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. ज्या दिवशी मी लहान भावाला सांगितलं, मी आराम करतो, आता तू सांभाळ. मग त्यावेळी तुम्हीच सांभाळा. तुम्हाला छोटा माहितीय ना? तोफ आहे तो..."


"15 सेकंद म्हणतायत... 15 सेकंद... मी कोंबडीचं पिल्लू आहे का? सांगा ना कुठे यायचंय, मी तिथे येतो... तुमच्या वडिलांना विचारा... दिल्लीतल्या तुमच्या वडिलांना विचारुन सांगा आम्हाला, तुमच्या घरी येऊ, ऑफिसमध्ये येऊ... कुठे येऊ? म्हणे, 15 सेकंदात हे करणार... अरे काय सुरूये?", असं असदुद्दीनं ओवैसी म्हणाले.