Colaba Vidhan Sabha Constituency 2024 : कुलाबा विधानसभा मतदारसंघ (Colaba Constituency) महाराष्ट्रातील (Maharashtra Election 2024) 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक. दक्षिण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार डॉ. राहुल नार्वेकर आहेत. कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या कुलाब्यात गेल्या दोन टर्ममध्ये भाजपनं आपली पकड मजबूत केली आहे. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी या मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर भाजपचं कमळ फुलवलं. 2014 मध्ये माजी आमदार राज पुरोहित आणि 2019 मध्ये राहुल नार्वेकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अशातच यंदा तिसऱ्यांदा कुलाब्याच्या ताबा स्वतःकडे घेण्यासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हिरा नवाजी देवासी (Hira Nawasi Dewasi) निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कुलाबावासी कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने?
उमेदवाराचं नाव | पक्ष |
राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) | भाजप (महायुती) |
हिरा नवाजी देवासी (Hira Nawasi Dewasi) | काँग्रेस (महाविकास आघाडी) |
अर्जुन गणपत रुखे (Arjun Ganpat Rukhe) | बहुजन समाज पार्टी (बीएसपी) |
2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजपचे राहुल नार्वेकर यांना 57,420 मतं मिळाली (विजयी)
INC चे अशोक जगताप यांना 41,225 मतं मिळाली
VBA चे जितेंद्र रामचंद्र कांबळे यांना 3,011 मतं मिळाली
2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजपचे राज के. पुरोहित यांना 52,608 मतं मिळाली (विजयी)
शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांना 28,821 मतं मिळाली
काँग्रेसच्या ऍनी शेखर यांना 20,410 मतं मिळाली.
मतदारसंघाबाबत थोडंसं...
कुलाब्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी तगडी लढत होत आहे. 2019 मध्ये भाजपनं ही जागा जिंकली होती. पण, त्यापूर्वी हा काँग्रेसचा गड होता. यंदाची निवडणूक चुरशीची असल्यामुळे काँग्रेस आपला जुना गड आपल्याकडे घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार यात काही शंकाच नाही. मात्र, सध्याचे विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघावर पगडा आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार हिरा नवाजी देवासी आणि राहुल नार्वेकर यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या दक्षिण मुंबईत येणाऱ्या या मतदारसंघात बहुभाषिक वस्ती आहे. या मतदारसंघात गुजराती आणि मराठी भाषिक मतदार आहेत. तसेच, दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ असूनही याठिकाणी अनेक प्रश्न आहेत.
जुन्या चाळी, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडीसोबतच अनेक चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. याशिवाय या मतदारसंघात येणारा कुलाबा कोळीवाड्याचा पुनर्विकासाचा प्रश्नही आहे. तसेच, विकास प्रकल्पांमुळे मच्छीमारांचे होणाऱ्या नुकसानाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे यंदा मतदारराजा या सर्व गोष्टी लक्षात ठेवून, त्यानंतर आपल्या मतांचं दान योग्य उमेदवाराला देणार, यात काही शंका नाहीच.
दरम्यान, यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत चुरशीची मानली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पक्षांतर्गत बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राज्यातील जनतेनं अभूतपूर्व सत्तासंघर्ष पाहिला. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रत्येकासाठी अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणात झालेल्या बदलानंतर आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुलाबा विधानसभा मतदारसंघावर यंदा कुणाचा झेंडा फडकवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.