18th Lok Sabha First Session Today: नवी दिल्ली : आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला (18th Lok Sabha First Session) सुरुवात होणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election Result 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार (NDA Government) सत्तेत आलं. त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसह मोंदींच्या मंत्रिमंडळातील (Mondi Cabinet) मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आज खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील. 


देशाच्या 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेणार आहेत. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातले पाच मंत्री आणि 14 खासदार आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. सकाळी 11 ते 1 या वेळेत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंगळवारी उरलेल्या 29 खासदारांचा शपथविधी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे. 


आज सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भाजप खासदार भर्त्रीहरी महताब यांना प्रोटेम स्पीकर म्हणून राष्ट्रपती भवनात शपथ देतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू केलं जाईल. त्यानंतर प्रोटेम स्पीकर इतर सदस्यांना शपथ देण्याचं काम सुरू करतील. यासोबतच अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड 26 जून रोजी होणार असून 27 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.


मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह सर्वात आधी शपथ घेणार 


पॅनेल सदस्यांच्या शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू होईल. राजनाथ सिंह सर्वात आधी शपथ घेणार आहेत. त्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर आणि इतर कॅबिनेट मंत्री अनुक्रमे शपथ घेतील. कॅबिनेट मंत्र्यांनंतर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि त्यानंतर राज्यमंत्री शपथ घेतील. मंत्र्यांच्या शपथेनंतर राज्यांचे खासदारांचा शपथविधी पार पडेल. सर्वात आधी, अंदमान आणि निकोबारचे खासदार विष्णू पद रे यांना शपथ दिली जाईल, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार आणि इतर राज्यांच्या खासदारांना क्रमानुसार शपथ दिली जाईल.


नव्या सरकारच्या कामाची रूपरेषा राष्ट्रपती सादर करणार 


मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. नव्या सरकारच्या पाच वर्षांच्या कामाची रूपरेषाही त्या सादर करणार आहेत. 27 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार असल्याचं समजतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आक्रमक विरोधक विविध मुद्द्यांवर एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.


प्रोटेम स्पीकरच्या निवडीवरुन वाद, अधिवेशनात पडसाद? 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वप्रथम खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. पीएम मोदींनी शपथ घेतल्यानंतर प्रोटेम स्पीकरला मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पॅनेलचे सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील. प्रोटेम स्पीकरच्या अनुपस्थितीत या पॅनेलचे सदस्य सदस्यांना शपथ देतील. पॅनलमध्ये सध्या 5 सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पॅनलमध्ये काँग्रेसचे के सुरेश, भाजपचे राधामोहन सिंह आणि फग्गन सिंह कुलस्ते, डीएमकेचे टीआर बालू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय यांचा समावेश आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी म्हटलं आहे की, त्यांचे खासदार पॅनेलचा भाग नसतील आणि त्यामुळे ते सदस्यांना शपथ देणार नाहीत. के सुरेश यांना प्रोटेम स्पीकर न केल्यानं काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार आहे.


प्रोटेम स्पीकर पदाच्या वादाचा परिणाम अधिवेशनावर होऊ शकतो. खरं तर महताब यांच्या प्रोटेम स्पीकरच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली आहे. या पदासाठी काँग्रेसचे सदस्य सुरेश यांच्या दाव्याकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याच वेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भा सांगताना म्हटलं आहे की, महताब सलग सात वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत, त्यामुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार आहेत.