ठाणे: सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबाण नाही, पक्ष नाही. खरी शिवसेना मी वाचवली. त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले. मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही. मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले. ते रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.


एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ डागली. काही लोक ठाण्यात फिरुन काहीतरी सांगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले. तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात. आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत. यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल. हे सगळे माझे उमेदवार नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात. पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरुन जातात. पण आपण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो. गेल्या 10 वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रुपाने काम करणारा खासदार मिळाला. आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचे आहे. काही लोक ठाण्यात आले, कुठेतरी फिरले, काय केलं हे माहिती आहे. त्याबद्दल मी नंतर सांगेन, अशा शब्दांत शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला. 


विदर्भात मतदान झालेल्या पहिल्या टप्प्यातील सर्व जागांवर महायुतीचा विजय होईल: एकनाथ शिंदे


महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या पूर्व विदर्भातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असे भाकित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविले. आता आपल्या ठाण्यातही महायुतीच्या उमेदवाराला जिंकून आणायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. 2019 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि जनतेच्या विचाराचे सरकार झाले पाहिजे होते. पण तेव्हा हे काँग्रेससोबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ती चूक आम्ही दुरुस्त केली. त्यांच्या अहंकाराने राज्य खड्ड्यात घालण्याचे काम केले. आज याठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. या देशामध्ये 10 वर्षात मोदी सरकारने काम केले आहे. तुम्हाला काम करणारा व्यक्ती हवा की गरम होतंय म्हणून परदेशात आराम करणारा व्यक्ती हवा, हे तुम्ही ठरवा, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 


महिलांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देणार: मुख्यमंत्री


आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिणी म्हणायचे. आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा केल्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे, यासाठी योजना सुरु केल्या आहेत. आगामी काळात महिलांना 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.


आणखी वाचा


एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदे सेनेकडून निवडणूक लढवण्याची ऑफर