मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांचा आरोप आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चांगल्याप्रकारे उत्तर देऊ शकतील, जर त्यांनी हे आरोप मान्य केले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपाच्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी (devendra Fadnavis) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं. जर एकनाथ शिंदेंनी जरांगेचे आरोप खरे आहेत, असं म्हटलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हानच फडणवीसांनी दिलं होत. त्यावर, आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) रोखठोक शब्दात देवेंद्र फडणवीस यांचं मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) असलेलं योगदान सांगितलंय.
मराठा समाजाला आरक्षण देताना, मी , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो होतो. आम्ही विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आपण मराठा आरक्षणाचा जो कायदा केला, त्यात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका होती. न्यायाधीश शिंदे समिती आपण नेमली, मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात आपण कुणबी प्रमाणपत्रही देण्यास सुरुवात केली. ज्या सवलती होत्या, तेही देण्याचं काम केलंय. आम्ही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयात कोण गेलंय, हेही अगोदर पाहावे, त्यातही विरोधी पक्षाचाच हात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं. त्यावेळीही मी मंत्री होतो, त्या समितीमध्ये होतो, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामध्ये, कुठलंही तथ्य नाही, हा खोटा आरोप आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीसह इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही आमची भूमिका काल, आज आणि उद्याही कायम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते फडणवीस
मनोज जरांगे पाटलांचं (Manoj Jarange) माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर माझं मत आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन. एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले, किंवा शिंदे साहेबांनी केले. शिंदे साहेबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलेलो आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, तर मी राजीनामा देईनच , पण राजकारणातून देखील संन्यास घेईन, असा पुनरुच्चारही फडणवीसांनी केला.