मुंबई : रायगडात महायुतीत (Mahayuti) पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे विश्वास घातकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महेंद्र थोरात यांच्या टीकेला सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यांनी देखील महेंद्र थोरवे यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. कर्जत खोपोली खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रविवारी एका कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. कर्जत मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते सुधाकर घारे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या महायुतीतील वादामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सुनील तटकरे यांचे प्रत्युत्तर
महेंद्र थोरवे यांच्या घणाघाती टिकेनंतर सुनील तटकरे काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सुनील तटकरे यांनी महेंद्र थोरवेला मी मोजत नाही. माझे स्थानिक नेते त्याला उत्तर देतील, असे म्हटले आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर आता महेंद्र थोरवे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर लोक काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, भाजपचे प्रमुख बावनकुळे आणि फडणवीस यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो, बाकीच्यांकडे नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्र्वासघातकी : सुधाकर घारे
दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सुधाकर घारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्र्वासघातकी आहेत. विश्वासघात कोणी केला आणि कोण करतंय? हे जनतेला माहीत आहे. महेंद्र थोरवे यांनी अशी टीका करणे त्यांना शोभत नाही. थोरवे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे वक्तव्य करत असल्याचा पलटवार घारे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले महेंद्र थोरवे?
महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय की, महायुतीत राहून भरघोस निधी मिळवून महायुतीविरोधात षडयंत्र रचण्याचे काम सुरू आहे. रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या आमदारांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच विजय मिळाला याचा विसर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विश्वासघातकी पक्ष असून रायगड जिल्ह्याचे नेतृत्वदेखील विश्वासघातकी असल्याचा आरोप त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता केला आहे. तसेच महायुतीत राहून गद्दारी करत असाल तर बाहेर पडा आणि समोरून लढा. महेंद्र थोरवे लढण्यासाठी सक्षम आहे, असे खुले आव्हानच सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांना महेंद्र थोरवेंनी दिले आहे.
आणखी वाचा