मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर 18 व्या लोकसभेसाठी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. तर, काहींनी हिंदीत शपथ घेतली. मात्र, अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ सर्वात चर्चेत आणि लक्षवेधी ठरली. लंकेच्या शपथविधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर, दुसरीकडे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Assauddin Owaisee) यांनीही घेतलेल्या शपथविधीचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता, खासदार ओवैसींच्या या शपथविधीच्या व्हिडिओवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच, ओवैसींकडून भारतीय संविधानाचे उल्लंघन झाल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 


भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसींच्या शपथविधीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूं यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवैसींनी जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेस राणा यांनी आक्षेप घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 102/103 नुसार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.ओवैसी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेताना, जय पॅलेस्टाईनचा नार देत आपली शपथ पूर्ण केली होती. त्यामुळे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी पत्रातून केला आहे. 


18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केला. प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी 'जय भीम, जय तेलंगणा' आणि नंतर 'जय पॅलेस्टाईन'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला होता. तर, सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथेवर टीका करण्यात आली. 




हैदराबादमधून ओवैसी 5 व्यांदा खासदार


हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत ओवैसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी नव्या सदस्यांना शपथ दिली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत आले आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने 9 जून रोजी शपथ घेतली.