CM Eknath Shinde On Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलं. तसंच "स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी राऊतांचं नाव न घेता दिला. 


संजय राऊत यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा आरोप त्यांनी या पत्रात केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास केला जाईल. जो दोषी असेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल." "आमच्याकडे पोलिसांची एक समिती आहे जी सुरक्षेचा आढावा घेते आणि ज्यांना जशी सुरक्षा गरजेची आहे, तशी सुरक्षा दिली जाते. परंतु जर कोणी स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्याविरोधातही कारवाई केली जाईल," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.


पत्रात संजय राऊत यांनी कोणता आरोप केला?


संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की, आपल्या जीवाला धोका आहे. आपल्याला जीवे मारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिली आहे.


संजय राऊत यांनी पत्रात पुढे म्हटलं की, "राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर माझी सुरक्षाही काढण्यात आली. याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता तुमच्यापर्यंत ही बाब पोहोचवणं गरजेचं होतं. मला कोणतीही सुरक्षा नको, कारण मी एकटा वाघ आहे."


राऊतांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिसांचं पथक नाशिकमध्ये


संजय राऊत यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्रातील तापलेल्या राजकीय वातावरणाला आणखी हवा मिळाली आहे. संजय राऊत यांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी ठाणे पोलीस आज नाशिकला पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार आज ठाणे पोलिसातील ACP रँकच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वा सहा पोलिसांचं पथक नाशिकमध्ये पोहोचलं आहे. नाशिकमधील एका हॉटेलमध्ये संजय राऊत सध्या मुक्कामाला आहेत.


VIDEO : Sanjay Raut यांचा जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलीस नाशकात, जीवाला धोका असल्याचं राऊतांचं पोलिसांना पत्र