नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रामटेक (Ramtek) विधानसभा मतदारसंघातून आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आम्हाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे नाही. आम्हाला आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा आहे, असं सांगत रामटेक मतदारसंघातील माजी आमदार आणि भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी (Mallikarjun Reddy) यांनी आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. पाच वर्ष आमदार असताना आशिष जयस्वाल यांनी आमच्या पक्षावर, पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींवर तसेच कार्यकर्त्यांवर फक्त अन्याय केला आहे. त्यामुळे आशिष जयस्वाल यांच्या यंदाच्या उमेदवारीला आमचा विरोध असल्याचे मत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी व्यक्त केले आहे.
पक्षश्रेष्ठींचा आशिष जयस्वाल यांच्यासोबत साटेलोटे?
आमच्या पक्षश्रेष्ठींना वारंवार आम्ही सर्व कळवलं, तरीही आजवर आशिष जयस्वाल यांचीच चलती राहिली आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आशिष जयस्वाल यांच्यासोबत काय साटेलोटे आहे, हे आम्हाला माहीत नाही, असा गंभीर आरोपही मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला आहे. 17 ऑक्टोबर रोजी रामटेक विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये आम्ही पुढील निर्णय घेऊ, असं सांगत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षालाही एका प्रकारे इशारा दिला आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी आशिष जयस्वाल यांची उमेदवारी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवणी मध्ये विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात आशिष जयस्वाल यांचा पक्षप्रवेश करत त्यांची उमेदवारी ही जाहीर केली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष जयस्वाल अपक्ष लढले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. युतीधर्म न पाळता भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणूक लढवणाऱ्या जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
युतीधर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वाल यांना उमेदवारी का?
भाजपच्या मसनर कार्यालयात एक बैठक पार पडली आहे.त्यात रामटेकची जागा भाजपने लढवावी, अशी भुमिका देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. आशिष जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास भाजपच्या प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे देणार असाही सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा असल्याची माहिती आहे. मनसर येथे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मल्लिकार्जून रेड्डी त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. "2019 मध्ये युतीधर्म न पाळणाऱ्या आशिष जयस्वाल यांना उमेदवारी का”? असा संतप्त सवाल भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :