Sushama Andhare Vs Chitra Wagh : विधिमंडळात 20 मार्च रोजी दिशा सालियन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव दिशाच्या मृत्यू प्रकरणाशी जोडले जात आहे. त्याचेच पडसाद सभागृहात उमटले. आमदार तथा माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख केल्यानंतर परब आणि आमदार चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. आता याच टीकेला चित्रा वाघ यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना काय उत्तर दिलं?
चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांचे कुठेही नाव घेतलेले नाही. मात्र अंधारे यांनी केलेल्या टीकेलाच वाघ यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्वीट करत आपलं मत मांडलं आहे. "फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना. आम्ही काहीही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि आमच्या नादी लागलात तर रोजचं ठेचणार," असं चित्रा वाघ म्हणाल्या.
जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन...
तसेच, "पण काही सटरफटर वटवाघूळ फडफडायचे सोडत नाहीत. असो...स्वभाव एकेकाचा. कुणाच्या लेकराबाळांवर बोलताना मला त्रास होतोय. पण आमच्याबद्दल बोलताना मात्र सगळंच ताळतंत्र सोडलेलं आहे. म्हणून एकच प्रश्न... जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणतोय, काय बोलायचं या कार्यकतृत्वाच्या आलेखाला," असा टोला चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांना त्यांचे नाव न घेता लगावला आहे. विशेष म्हणजे त्यांनी खाली तळटीपही दिली आहे. "कीव वाटते प्रगाढ पोपट पंडिताची. स्वत:त हिंमत नाही म्हणून असल्या सटराफटरांना पुढे करावं लागतंय, असंही त्यांनी म्हटलंय.
सुषमा अंधारे यांनी काय टीका केली होती?
सुषमा अंधारे यांनी एक्स या समाजमाध्यमावर चित्रा वाघ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. "सभागृहाची सुसंस्कृत परंपरा, गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या की, 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा-कॉलेजात शिकवली जाते हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!" असे सुषमा अंधारे आपल्या ट्वीटच्या माध्यमातून म्हणाल्या.
हेही वाचा :