मुंबई : मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाचा आज 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) एनडीएमधील विविध पक्षांच्या या 72 खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, भाजपच्या सर्वाधिक मंत्र्यांनी शपथ घेतली असून घटक पक्षाच्या खासदारांना केवळ एक-एक मंत्रिपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे तेलुगू देसम पक्षाच्या चंद्राबाबू नायडू यांना 2 आणि नितीश कुमार यांच्या जनात दल युनायटेड यांच्याही दोनच खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मोदी सरकार 3.0 मध्ये शपथ घेतलेल्यांमध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांना संधी मिळाली आहे. मात्र, 7 खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेला केवळ 1 मंत्रीपद तेही राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) देण्यात आलं आहे.
एनडीए आघाडीतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज पंतप्रधानांसह केंद्रीयमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला मालदीव, मॉरिशस,श्रीलंका, बांग्लादेश, भूतान या देशांतील प्रमुखांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रीक केली असून मोदींसह नितीन गडकरी, रामदास आठवले या दोन्ही नेत्यांनीही मंत्रिपदाची हॅटट्रीक केली आहे. महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली असून भाजपच्या 2 नेत्यांना कॅबिनेटमंत्री, शिंदेंच्या 1 खासदाराला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि रिपाइंच्या रामदास आठवलेंसह उर्वरीत भाजपच्या 2 खासदारांना राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 4, शिंदेंचे 1 आणि रिपाइंचे 1 असे एकूण 6 मंत्री असणार आहेत.
मोदी सरकार 3.0 च्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या पक्षांमध्ये मुत्सदेगिरी (बार्गेनिंग पॉवर) करण्यात कर्नाटकचे एच.डी.कुमारस्वामी, लोजपाचे चिराग पासवान आणि रिपाइंचे रामदास आठवले महाराष्ट्रातील शिंदेंपेक्षा भारी ठरले आहेत. कारण, 7 खासदार असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 1 मंत्रिपद देण्यात आलं असून तेही केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हे देण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांच्याकडे 5 खासदार असून त्यांना कॅबिनेटमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर, रिपाइंच्या रामदास आठवले यांच्याकडे लोकसभेतून निवडून आलेला एकही खासदार नसताना त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे. त्यामुळे, या राजकीय मुत्सदेगिरीत शिंदेंपेक्षा लोजपा आणि कर्नाटकमधील जेडीएस वजनदार ठरल्याचं दिसून येत आहे.
एच.डी. कुमारस्वामींना कॅबिनेट
कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनात दल सेक्युलर पक्षाला 2 खासदार असतानाही त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले, तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी शपथ देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ह्या 6 मंत्र्यांनी घेतली शपथ
नितीन गडकरी - कॅबिनेट
पियुष गोयल - कॅबिनेट
प्रतापराव जाधव - राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
रामदास आठवले - राज्यमंत्री
रक्षा खडसे - राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ - राज्यमंत्री