लातूर : लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पराभवाचा सामना करावा लागला. मुंडेंच्या पराभवामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले असून काहींनी टोकाचे पाऊल उचलल्याचं दिसून येत. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ काही तालुक्यात बंदची हाकही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत. मात्र, इकडे बीड (Beed) जिल्ह्यात मुंडे समर्थक नाराज झाले असून दोन्ही पक्षाचे समर्थक सोशल मीडियावर भीडल्याचं दिसून आलं. त्यानंतर, पोलिसांनी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. दुसरीकडे पंकजा मुडेंच्या समर्थकांकडून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. त्यानंतर, पंकजा मुडेंकडून कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्यात आलं आहे. तर दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या सचिन मुंडे या कार्यकर्त्याच्या आईंशी फोनवरुन संवादही साधला.
भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर सचिन गेला, असा व्हिडिओ करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र या अपघाती मृत्यूनंतर सोशल मीडियावर त्याने आत्महत्या केल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सचिन कोंडिबा मुंडे हा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात यस्तर या गावचा रहिवासी होता. हे गाव बीड आणि लातूर जिल्ह्याच्या बॉर्डवर आहे. आज, पंकजा मुंडेंनी सचिनच्या मामाशी फोनवरुन संवाद साधला. त्याच फोनवरुन त्यांनी सचिनच्या आईसोबतही बोलणं करुन त्यांचं सांत्वन केलं.
मी काय बोलू त्या माऊलीला हे मलाच कळत नाही, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सचिन मुंढेच्या आईशी फोनवरुन संवाद साधला. माझ्याकडं शब्द नाहीत. फार वाईट झालं, मला ते बघून माझी छाती दुखायली. माय तुमचं सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. हाता तोंडाशी आलेलं लेकरू... मी दिल्लीत आहे, 6-7 दिवसांत मी येईल, मी तुम्हाला भेटायला येते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी म्हटले. माय तू काळजी घे, मोठं दु:ख आहे, पोटात खड्डा पडला असेल, माझ्याकडे शब्द नाहीत, मी आईला काय सांगू.. असे म्हणत पंकजा मुंडेंनी मृत सचिनच्या आईचे फोनवरुन सांत्वन केले.
सचिन गेल्याचा व्हिडिओ व्हायरल
सचिन मुंडे व्यवसायाने ट्रॅक्टर चालक. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पंकजा मुंडे यांचा विजय झाला नाही तर सचिन गेला असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी 7 जून म्हणजेच काल रात्री साडेआठ नंतर सचिनचा मृतदेह बोरगाव पाटीजवळ आढळून आला. त्यानंतर, पंकजा मुंडेंनी दिल्लीतून आज सचिनच्या आईशी फोनवरुन संवाद साधला, त्यांचे सांत्वन केले. तसेच, मी पुढील 6 ते 7 दिवसांत तिकडं येऊन तुम्हाला भेटेल, असेही ते म्हणाले.