MNS Raj Thackeray Marathi News: मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. 


2024 ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. मला वाटाघाटीमध्ये पाडू नका, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. राज ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही. महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी राज ठाकरेंचं आभार मानतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. नागपूरमध्ये एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. 


एकनाथ शिंदे विधानसभेच्या तयारीवर काय म्हणाले?


प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण पहिले लोकसभा तर होऊ द्या. पहिले लोकसभा आटपू द्या, मग विधानसभेचा पाहू, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 


पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर प्रेम-


पंतप्रधानांनी महाराष्ट्रात अनेक सभा दिल्या आहे. त्याचं महाराष्ट्र वर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.


उद्धव ठाकरेंवर घणाघात-


त्यांची सेना कुठली आहे? उठाबसा सेना? आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. धनुष्यबाण गहाण ठेवला. आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचा खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.






देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.
आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


मोदी पंतप्रधान व्हावे हे मी सर्वात प्रथम मी बोललो. ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या पटल्या नाहीत. मी एखाद्या गोष्टीवर टोकाचे प्रेम करतो. विरोध पण टोकाचा करतो. मी महाराष्ट्रावर  टोकाचे प्रेम करतो. पाच वर्षात ज्या गोष्टी पटल्या त्याचे अभिनंदन केले. ज्या गोष्टी पटत नाही त्याचा टोकाचा विरोध केला. विश्वास टाकला तर मी टोकाचे प्रेम करतो. मला भूमिका पटली नाही, म्हणून मी विरोध करतो. स्वर्थासाठी कधीच विरोध केला नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. 


येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी 


देशात सर्वाधिक तरुण आपल्याकडे आहे. देशाचे तरुण हेच देशाचे भविष्य आहे.देशातील तरणांकडे मोदींनी लक्ष द्यावे.  महाराष्ट्राला मोठा वाटा हवा, ही मोदींकडून अपेक्षा आहे. येणारी निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी  आहे. महाराष्ट्रात चुकीचा कॅरम फुटला आहे.  देशातील उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये, अशी अपेक्षा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. 


संबंधित बातम्या:


Raj Thackeray: राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची 3 प्रमुख कारणं


मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही, राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल