Punjab Confidence Motion: दिल्लीनंतर आता पंजाबमधील आप सरकारही विश्वासदर्शक मांडणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. यानंतर  मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही मोठी घोषणा केली आहे. मान यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मान म्हणाले की, 22 सप्टेंबर (गुरुवार) रोजी पंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाणार आहे.

भगवंत मान यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून म्हटले आहे की, पंजाबच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले सरकार पाडता यावे, यासाठी आमच्या आमदारांना आपल्या बाजूने घेण्याचे कसे प्रयत्न केले गेले, हे तुम्ही पाहिले असेल. पण तसे झाले नाही. पंजाबमध्ये जेव्हा निवडणुका सुरू होत्या आणि मतदान सुरू होते, तेव्हाही लोकांना आमिष दाखवले जात होते. पण या पैशाला लाथ मारून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला.






मान म्हणाले की, विश्वास ही अशी गोष्ट आहे ज्याचे जगातील कोणत्याही चलनात मूल्य नाही आणि आम्ही हा विश्वास कायम ठेवू. हा विश्वास कायदेशीररित्या मांडण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, जनतेने निवडून दिलेले आमदार पंजाबच्या स्वाभिमानासाठी लालसेला बळी पडणार नाहीत आणि जनतेचे स्वप्न पूर्ण करतील, हे या अधिवेशनात दाखवून देऊ. ते म्हणाले की, या अधिवेशनात आम्ही विश्वासदर्शक ठराव आणू, ज्यामध्ये जनतेचा त्यांच्या निवडून आलेल्या सरकारवर किती विश्वास आहे हे आम्ही दाखवून देऊ.


दिल्लीमधील आप सरकारनेही मंडल होता विश्वासदर्शक ठराव


दिल्ली विधानसभेत  (Delhi Assembly)  अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही 1 सप्टेंबर रोजी विश्वासदर्शक ठराव मन्दाला होता, जो त्यांनी जिंकला. त्यावेळी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 58 मते पडली. तर एकही आमदार विरोधात उभा राहिला नाही. उपसभापतींसोबत झालेल्या वादानंतर तीन भाजप आमदार विजेंदर गुप्ता, अभय वर्मा आणि मोहन सिंग बिश्त यांना सभागृहाबाहेर करण्यात आले होते.