नाशिक: मराठा समाजाच्या एकीमुळेच सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे. प्रत्येक टप्प्यात मोदींना महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावं लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे काय मोदींपेक्षा मोठे नेते लागून गेले का?, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले. ते रविवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी म्हटले की, जरांगे म्हणजे काय मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? अख्खा हिंदुस्थान जरांगेंना घाबरलाय. जरांगे काय सांगतात, काय बडबड करतात. त्याची अक्कलहुशारी किती? नाशिक आणि बीडमध्ये जाऊन मनोज जरांगे म्हणतात की, या ओपनच्या जागांवर ओबीसी उमेदवार कशासाठी उभे राहतात? त्यांना कळत नाही ओबीसींना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण नाही. ही गोष्ट ज्याला कळत नाही, त्याला आपण काय सांगायचं. मनोज जरांगे सध्या कोणाच्याही खिजगणतीतही नाही, ते उगाच बेडकाप्रमाणे फुगत आहेत, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.


लोक सहानुभूती पाहून नव्हे तर नेतृत्वाचा खंबीरपणा पाहून मतदान करतात: छगन भुजबळ 


मी एका मुलाखतीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांच्या मनात सहानुभूती आहे, असे म्हटले होते. त्यामुळेच लोक त्यांच्या सभांना गर्दी करतात. पण लोकसभा निवडणुकीत प्रश्न हा सहानुभूतीचा नसून खंबीर नेतृत्त्वाचा आहे. जागतिक परिस्थिती आणि अंतर्गत परिस्थिती पाहता लोक मोदींनाच मतदान करतील. सहानुभूतीपेक्षा देशाचं नेतृत्त्व खंबीरपणे कोण करु शकतं, या मुद्द्याला लोक जास्त महत्त्व देतील, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.


पुनम महाजनांचे तिकीट कापले,छगन भुजबळ म्हणाले...


यावेळी छगन भुजबळ यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पुनम महाजन यांचे तिकीट कापले, याविषयी विचारण्यात आले. त्यावर भुजबळांनी म्हटले की, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांना विचारायला पाहिजे. उज्वल निकम उत्कृष्ट असे वकील आहेत. राज्याच्या देशाच्या विरोधीचे आतंकवादी आहेत , त्यांच्याविरुद्ध यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली . त्यांनी सुरक्षेची पर्वा न करता देशसेवा केली. कदाचित त्याचे बक्षीस त्यांना मिळाले असेल, असे भुजबळ यांनी म्हटले.


आणखी वाचा


मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं