Chhagan Bhujbal : चाकण येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात येथेही आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि छगन भुजबळ एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. तर या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. या दोन्ही कार्यक्रमांवर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्यामुळे मी पुणे आणि साताऱ्याला निघालो आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून तिथे जातोय. आज कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि इतर मंत्री येत आहेत. नायगावमधील स्मारकाची घोषणा 2002, 2003 मध्ये केली होती.सावित्रीबाई यांचे घर पूर्ण पडले होते. ते घर जसेच्या तसे बनवले आहे. तिथे लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 एकर जागेत मुलींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहोत, त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. तसेच पुण्यातील भिडे वाडा स्मारकाचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार, अजितदादांची दांडी?
भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, पवार साहेब आणि मी एकत्र येणार हे खरे आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभे केले आहे. पवार आणि मला आमंत्रित केले आहे. फुलेंचा कार्यक्रम जिथे असतो त्या कार्यक्रमाला मी जातो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार कुठे आहे हे मला माहिती नाही. ते मुंबईत असतील तर कार्यक्रमाला येतील, बाहेर असतील तर येणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा