Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) महायुतीत अजून तिढा कायम आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी या जागेसाठी जोर लावलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हे देखील या जागेसाठी आग्रही होते. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात छगन भुजबळ म्हणाले की, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार (Ajit Pawar) यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. तिथे जागा वाटपाबाबत चर्चा झाली.
तीन आठवडे झाले अजूनही उमेदवार जाहीर नाही
छगन भुजबळ यांना उभे करा, असे थेट अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना म्हणाले की, तिथे हेमंत गोडसे (Hemant Godse) आमचे उमेदवार आहेत. परंतु अमित शाह म्हणाले की, आम्ही त्यांना समजावू. त्यानंतर आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं लक्षात आलं. अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचं लक्षात आले. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारीबाबत माध्यमातून बातमी बाहेर आली. हे सूरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का? हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला ते म्हणाले की, अमित शाह यांनी तुम्हाला लढावं लागेल असे सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा तेच बोलले. त्यानंतर तीन आठवडे गेले. मात्र, अजूनही उमेदवार जाहीर झालेला नाही.
मी या निवडणुकीतून माघार घेतली - छगन भुजबळ
महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढं गेला आहे. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या नाशिकच्या जागेवर महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार आहे. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा