मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar Camp) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar) यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले, मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती. त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते झोपलेले होते. म्हणून मी एक ते दीड तास थांबलो. उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही. मी मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. पण महाराष्ट्रात सध्या ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिलं, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, शरद पवारांचे भुजबळांना आश्वासन
मी त्यांना म्हणालो की, तुम्ही राज्यातील सर्वांत ज्येष्ठ नेते आहात. राज्यातील परिस्थितीचा तुम्हाला सर्वाधिक अभ्यास आहे. आम्ही मंत्री झालो म्हणजे आम्हाला याचा खूप अभ्यास आहे, असं समजायचं कारण नाही. ते म्हणाले की बरोबर आहे. पण तुमची अगोदर काय चर्चा झाली हे आम्हाला माहितीच नाही. मग मी म्हणालो की तुम्ही आम्हाला बोलवा. आम्ही तुमच्याकडे येतो. शरद पवार म्हणाले की मी एक-दोन दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो. आम्ही दोन-चार लोकं एकत्र बसतो. काय झालं, काय होतंय, काय करायला पाहिजे यावर चर्चा करू. मी तयार आहे. माझी प्रकृती बरी नाही. पण दोन दिवसांत आपण यावर चर्चा करू.
आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण नको : छगन भुजबळ
गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांना भेटण्याआधी प्रफुल्ल पटेलांशी चर्चा केली : छगन भुजबळ
मला राजकारणाची, आमदारकीची तसेच मंत्रिपदाचीही चर्चा नाही. गोरगरिबांमध्ये दुफळी निर्माण होऊ नये, हाच माझा उद्देश आहे. त्यासाठी मी कोणालाही भेटायला तयार आहे. कोणालाही विनंती करायला मला थोडाही कमीपणा वाटणार नाही. मी फक्त घरून निघताना प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी मला जा असं सांगितलं, असे छगन भुजबळ म्हणाले.