मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Cabinet Expansion) सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. भाजपमधील 19, शिंदेंच्या शिवसेनेतील 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 9 नेत्यांना मंत्रि‍पदाची संधी घेतली. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय. छगन भुजबळ हे नागपूरमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2024) सोडून नाशिकला (Nashik) दाखल झाले. नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर शुक्रवारी ते मुंबईत पोहोचले. आज आणि उद्या ते राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 


नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होताच छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ते तातडीने नाशिकला रवाना झाले होते.  जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.  छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटले. अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर देखील ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आले. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. नाशिक आणि येवल्यात समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला होता.  वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे तिघेच पक्षाचा निर्णय घेतात. आम्हाला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत शून्य स्थान आहे, असेही त्यांनी म्हटले होते. 


छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? 


यानंतर छगन भुजबळ शुक्रवारी नाशिकहून मुंबईला रवाना झाले. आज आणि उद्या ते मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. ओबीसी नेत्यांची मते जाणून छगन भुजबळ पुढील निर्णय घेणार आहेत. आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. या भेटीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना छगन भुजबळांची मनधरणी करण्यात यश मिळणार की छगन भुजबळ वेगळा मार्ग निवडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा 


Chhagan Bhujbal : वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा अजित पवारांवर संताप, समर्थकांसमोर सगळंच काढलं!