नागपूर: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजितदादा गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना नेहमीप्रमाणे मंत्रीपद मिळणार, याबद्दल अनेकांना खात्री होती. मात्र, रविवारी नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 मंत्र्यांच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव नसल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळाला धक्का बसला होता. छगन भुजबळ यांच्यासारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळातून बाहेर कसे ठेवले गेले, असा प्रश्न कालपासून सर्वतोमुखी आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
भाजप आमदाराने छगन भुजबळ यांची राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असल्याचा दावा केला आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला नाही. त्यांना राज्यपाल केले जाणार आहे, असा दावा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केला. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी नाही, असेही देशमुख यांनी म्हटले. देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. छगन भुजबळ यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील ताकद अजूनही कायम आहे. ओबीसी नेता म्हणून त्यांचे राजकीय वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत छगन भुजबळ हे राज्यपाल पद स्वीकारण्यास राजी होतील का, हाच मोठा प्रश्न आहे. यावर आता छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ते अधिवेशन सोडून कालच नाशिकमध्ये दाखल झाले होते. छगन भुजबळ मंगळवारी नाशिकच्या भुजबळ फार्म आणि येवला मतदार संघातील कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेटून करणार संवाद साधणार आहेत. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भुजबळ समर्थक आणि ओबीसी संघटना काल रस्त्यावर उतरल्या होत्या. काही ठिकाणी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. त्यामुळे आता छगन भुजबळ काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर
छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं असं मत ष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती आता समोर येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली. विधानसभेला भुजबळांमुळेच ओबीसी समाज एक व्हायला मदत झाली. त्यामुळे भुजबळांना मंत्री करणं गरजेचे, असे अनेक आमदारांचे म्हणणे आहे. आता छगन भुजबळांवर अन्याय झाला तर आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा
अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?