मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या प्रचंड नाराज आहेत. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केवळ हजेरी लावून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती. तसेच आता आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवू, असा सूचक इशाराही छगन भुजबळ यांनी दिला होता. 


ऐशींच्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भुषविलेल्या आणि राज्यातील प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे धारिष्ट्य अजित पवार यांना का दाखवले, याची चर्चा या सगळ्यानंतर रंगली आहे. यासाठी काही दोन-तीन गोष्टी कारणीभूत मानल्या जात आहेत. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी घेतलेली प्रखर ओबीसीवादी भूमिका अजित पवार यांच्यासाठी अडचणीची ठरली होती. भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची भीती होती. तरीही छगन भुजबळ यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका जोमाने रेटली होती.


छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असले तरी ते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला छेद देणारी भूमिका घेताना दिसून आले होते. हे करताना भुजबळांनी अजित पवार यांनाही जुमानले नव्हते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी छगन भुजबळ यांनी स्वत:ची स्वतंत्र भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मनोज जरांगे यांच्याविरोधात कोणीही चकार शब्द काढत नसताना छगन भुजबळ हे मात्र जरांगेंवर टीकेचे बाण सोडत होते. त्यामु ळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याचे चित्र होते. भुजबळ कुठेतरी आपल्या निर्णयांपेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत आणि पक्षासाठी अडचण ठरत आहेत, असे अजित पवारांना वाटत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आधी छगन भुजबळ यांना दूर करणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नव्हते. मात्र, आता सत्ता आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर ठेवण्याचा आत्मविश्वास अजित पवार यांना आला असावा, असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.


राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील 'ते' वक्तव्य भुजबळांना भोवलं?


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजदीप सरदेसाई यांचे ‘2024: द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकात छगन भुजबळ यांच्यासंबंधीच्या एका प्रकरणाचा उल्लेख होता. यामध्ये छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट आणि अजित पवार यांची भाजपसोबत सत्तेत जाण्यामागील भूमिका विषद केली होती. त्यामध्ये भुजबळ यांनी म्हटले होते की, भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्म होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. काही काळ तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला पुन्हा ईडीची नोटीस आली होती. अजूनही तुरुंगाचे दिवस आठवल्यावर झोप उडते. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. अशा वळी भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती, असे छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. या सगळ्याचा उल्लेख संबंधित पुस्तकात होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे पुस्तक प्रकाशित झाल्याने अजित पवार यांची कोंडी झाली होती, तसेच त्यांच्या चारित्र्यावर पुन्हा शंका उपस्थित झाल्या होत्या.



आणखी वाचा


Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले