Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटेन, राहुल गांधींना (Rahul Gandhi) देखील भेटेन असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी स्पष्ट केलं आहे. 


राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत


 छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही येणार की छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेलेत? अशी चर्चा दुपारपर्यंत राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात पवारांना भेटलो असं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत.  मात्र, शरद पवारांना मी राजकीय विषयासंदर्भात भेटायला गेलो नव्हतो. राज्यात सध्या मराठा समाज ओबीसी समाजाच्या लोकांकडे जात नाही आणि ओबीसी समाजातील लोक मराठा समाजाच्या लोकांकडे जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे शरद पवारांसोबत या प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले. 


पूर्वसूचना न देता भुजबळ आल्यामुळे त्यांना तब्बल दीड तास वेटिंगवर


छगन भुजबळ सोमवारी 10 वाजून 20 मिनिटांनी सिल्वर ओक निवासस्थानी आले. त्यानंतर साधारणपणे सव्वा बारा वाजता सिल्वर ओक निवासस्थानातून बाहेर पडले. शरद पवार हे आजारी असल्यामुळे आणि कोणतीही पूर्वसूचना न देता भुजबळ आल्यामुळे त्यांना तब्बल दीड तास वेटिंगवर थांबाव लागलं. मी पवारांची वेळ घेतली नव्हती त्यामुळे मला त्यांची वाट पाहत थांबाव लागलं. ते आजारी असल्यामुळे कुणालाच भेटत नाहीत, असं भुजबळ यांनी सांगितलं. 


छगन भुजबळ जरी अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी पोहचले असले तरी माध्यमांमध्ये मात्र शरद पवार भुजबळ भेटीच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. किंबहुना आगामी काळात काही वेगळं गणित तर शरद पवारांच्या डोक्यात नाहीत ना अशा ही चर्चा रंगू लागल्या होत्या. ही बाब लक्षात येताच तात्काळ शरद पवारांच्या कार्यालयाकडून भुजबळांना कोणतीही वेळ देण्यात आली नव्हती, असं स्पष्ट करण्यात आलं. तसेच ते मागील दीड तासांपासून शरद पवारांच्या भेटीसाठी वेटिंगवर असल्याची माहिती देण्यात आली. 


सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील उलट सुलट चर्चा 


छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी अचानक गेले, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील उलट सुलट चर्चा सुरु झाली. किंबहुना विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्यावतीने आरक्षणाच्या लढ्यात सत्ताधारी पक्षाला येत असलेल्या अपयशामुळे शरद पवारांना भागीदार करण्यासाठीचा हा डाव असल्याची टीका करण्यात आली तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील भुजबळ भेटीला जाणं म्हणजे सरकारचाच डाव असल्याचं म्हंटलं आहे


छगन भुजबळांनी मात्र आजच्या भेटीवर बोलताना शरद पवारांनी आरक्षणाच्या लढ्याबाबत लवकरच आपण एकत्रित बसून चर्चा करु असं आश्वासन दिल्याची माहिती दिली आहे. परंतु तरीदेखील राजकारणात कधी केव्हा काय होईल कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे राज्यातील आगामी काळातील एका वेगळ्या राजकारणाची तर ही नांदी नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar on Nilesh Lanke : निलेश लंके 'या' अटीवर माझ्याकडून लोकसभा लढण्यास तयार होते; अजित पवारांनी सांगितली अंदर की बात