Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कमालीचे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने ते राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र, आता छगन भुजबळ येवला मतदारसंघात (Yeola Assembly Constituency) अॅक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांना पत्र दिले आहे.
नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा, नाशिक तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने (Nashik Unseasonal Rain) शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतातील गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, कपाशी,हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाला अवकळीने पुन्हा अडचणीत आणले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने व वातावरणीय बदलांमुळे ऐन हिवाळ्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. तसेच गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. परिणामी, उन्हाळी कांद्याच्या रोपांना व रब्बी पिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा ओला झाला आहे तर काढणीला आलेला कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक जमिनीवर आडवे झाले आहे. गव्हाच्या ओंब्यांमध्ये बी तयार होत असताना पिक आडवे पडल्याने शेकडो हेक्टरवरील गहू हाताशी येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतात उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना केली आहे.
आणखी वाचा