पुणे : राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाच्या प्रश्नी मार्ग काढायचं सोडून शरद पवार (Sharad Pawar) हे विरोधी पक्षांना काहीतरी सल्ले देऊन महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत असा थेट आरोप राज्याचे मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला. तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, मग राज्यातल्या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवालही भुजबळांनी शरद पवारांना विचारला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा बारामतीमध्ये मेळावा होता. त्यामध्ये छगन भुजबळ बोलत होते. 


बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला


शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन यावं अशी विनंती जितेंद्र आव्हाडांना केली होती. व्ही पी सिंहांनी जे ओबीसी आरक्षण दिलं त्याची अंमलबजावणी शरद पवारांनी केलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आता आरक्षणाच्या बाबतीत जे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी त्या बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला. 


ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय? 


तुमचा राग हा अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण मग ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला. ते म्हणाले की, बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मंतं दिली. पण सगळ्यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही. 


विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू असल्याचा थेट आरोप छगन भुजबळांनी शरद पवारांवर केला. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय असंही छगन भुजबळ म्हणाले. 


राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असंही छगन भुजबळ म्हणाले. 


दरम्यान, भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केली. भाषण पूर्ण होताच उपस्थितातून 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देण्यात आल्या


ही बातमी वाचा: 



VIDEO Chhagan Bhujbal Baramati : बारामतीत ऐन वेळेला फोन आल्यानं विरोधक आले नाही : छगन भुजबळ