Nagpur News नागपूर : विधानपरिषदेची निवडणूकीत (Vidhan Parishad Election Result) काँग्रेस पक्षाची काही मते फुटली असल्याचे समोर आले आहे. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले (Nana Patole) यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस (Congres) सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक आमदाराला एक फॉरमॅट दिला होता. कोणत्या आमदाराने कुठल्या पक्षाला मतदान केलं आणि कुठल्या आमदाराने पक्षाविरोधात मतदान केलं, हे शंभर टक्के ओळखता आलं आहे. त्यामुळे अशा आमदारांची ओळख पटलेली असून काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. ते नागपूर (Nagpur News) येथे बोलत होते. 


संपूर्ण देशात इंडिया आघाडीला मोठे यश


देशभरात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया आघाडीकडनं जवळ जवळ सर्व निकाल लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण देशात इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे. सोबतच आगामी काळात देखील असं चित्र कायम राहणार आहे. इंडिया आघाडी प्रत्येक राज्यात मोठ्या ताकतीने निवडणुकांसाठी पुढे जात आहे.  इंडिया आघाडी प्रत्येक राज्यातील निवडणुकांमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढत आहे. त्यामुळेच अतिशय चांगले यश देखील आम्हाला मिळत असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले. 


दोन ग्रामीण तर नागपूर शहरात तीन मतदारसंघावर आमचा दावा- अनिल देशमुख


विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. अशातच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विदर्भात काहीशी पिछाडी  बघायला मिळाली. तर महाविकास आघाडीने मुसंडी मारत  मोठे यश संपादन केले आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने हिंगणा आणि काटोल सोबतच आणखी एका मतदारसंघाबाबत दावा करण्यात आला आहे. याविषयी भाष्य करताना अनिल देशमुख म्हणाले की, ग्रामीणमध्ये दोन मतदारसंघावर आमचा दावा असून उमरेड साठी देखील आम्ही दावा करणार आहोत.


सोबतच शहरांमध्ये दोन मतदारसंघावर आम्ही दावा करणार असल्याचे देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत शहरांमध्ये कधीही उमेदवारी घेतली नाही. त्यामुळे नागपूर शहरांमध्ये देखील यंदा आम्ही उमेदवारी घेणार आहोत. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर आमची चर्चा झाली आहे. मात्र याबाबतचा निर्णय इतर मित्र पक्षाशी चर्चा करून ठरवू, असे देखील देशमुख म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या