Ranjitsinh Mohite-Patil and Chandrashekhar Bawankule, Mumbai : एका बाजूला पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू असतानाच आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांना चक्क अभिनंदनाचे पत्र दिल्याने पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याची तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आणि माळशिरस (Malshiras) येथील पराभूत उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी पक्षाकडे केली होती. लोकसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि इतर राष्ट्रीय नेते येऊनही आमदार मोहिते पाटील यांनी याकडे पाठ फिरवल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला होता. याशिवाय विधानसभेलाही नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत रणजीत सिंह मोहिते पाटील अनुपस्थित होते. 


लोकसभा निवडणुकीत त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला तर विधानसभेला शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना विजय केल्याचा आक्षेप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आमदार मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केल्याचे पत्र दिले आहे. या पत्रात भाजपाचे अंत्योदयाचे धोरण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.


आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे. संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत. आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन ! असा मजकूर आहे. 


मोहिते पाटील यांना लोकसभेची उमेदवारी डावल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने महाविकास आघाडीचे काम केले आणि भाजपच्या ताब्यात असलेले सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या. यानंतर विधानसभेलाही जिल्ह्यातील अकरापैकी सहा आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणण्यात मोहिते पाटील यांची ताकद असल्यानेच राज्यभर महायुती विरोधकांचा सुपडा साफ करत असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीने दणदणीत यश मिळविले होते. मोहिते पाटील हे जर भाजपपासून दूर गेले तर याचा फटका भाजपलाच बसेल याचा अंदाज पक्षाला आल्याने कारवाईच्या ऐवजी अभिनंदन असे पत्र दिल्याची चर्चा मोहिते पाटील समर्थकात दिसून येत आहे. तसे पाहता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मोहिते पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून सोलापूरच्या पालकमंत्रीपदावरही जयकुमार गोरे यांना आणल्याने मोहिते समर्थक अस्वस्थ होते. मात्र आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे अभिनंदन केले आहे.  यामुळे मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेऊन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठीच त्यांच्यावरील कारवाईचा विषय मागे पडणार असण्याची शक्यता आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Nashik Crime : रील बनवण्यासाठी महागड्या गाड्या चोरल्या, पोलिसांना 9 लाखांच्या फॅन्सी टू व्हिलर सापडल्या, मुलालाही उचललं