Chandrahar Patil: डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी काल रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आपण आता नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली होती. अगदी महाविकासाकडे काँग्रेससोबत मतभेद निर्माण होऊन ठाकरेंच्या शिवसेनेत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र काल चंद्रहार पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताच चंद्रहार पाटील काय म्हणाले?
पक्ष प्रवेशासाठी महाराष्ट्रातून जमलेले पैलवान याचा आभारी आहे. मंत्री उदय सामंत यांनी आणखी ताकद लावली असती तर 20 हजार लोकं आली असती. 2006 रोजी जिल्हा परिषदेची निवडणुकीत अनिल बाबर यांनी मला उभं केलं. माझे राजकिय गुरू अनिल बाबर होते. माझा आक्षेप नेत्याविषयी नाही तर महाविकास आघाडीवर आहे. शेतकऱ्यांच्या पोराला हवरण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते एकवटले. परंतु मी मागे हटलो नाही, 60 हजार मतं पडली, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची किड- चंद्रहार पाटील
घराणेशाहीची किड लागलेला जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आहे. मी एकनाथ शिंदेंकडे कुठलेही पद मागितलेले नाही. मी क्रीडा क्षेत्रासाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मातीतील खेळाला प्राधान्य देण्यासाठी आलोय. सांगलीत आपला पक्ष 1 नंबर कसा राहिल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पैलवान चंद्रहार पाटील हे आता कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी 2022 मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले आहे. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आता शिवसेनेची आहे असे यावेळी आवर्जून नमूद केले. सीमेवरील जवानांसाठी दिल्लीत रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यांची देशभक्ती पाहता दिल्लीत काय काश्मीरमध्ये रक्तदान शिबीर घेऊ असेही याप्रसंगी जाहीर केले.
कोण आहेत चंद्रहार पाटील?
1) चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी पदकाचे मानकरी...
2) 2008 साली सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा विजयी...
3) 2024 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विरोध डावलून उबाठाने चंद्रहार पाटील यांना दिली उमेदवारी.. त्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला...
4) त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक म्हणून देण्यात आली जबाबदारी...
शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटलांचं पहिलं भाषण, VIDEO:
संबंधित बातमी:
सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत पवार, शिंदे, फडणवीसांचं पुसलं जाणार नाही; सुनिल तटकरेंकडून फुल्ल कौतुक