Amarinder Singh Joins BJP: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे (PLC) प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यासह त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस (PLC) भाजपमध्ये विलीन केला आहे. त्यांच्या भाजप प्रेवशवेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते. यावेळी बोलताना तोमर म्हणाले की, पीएलसीचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल. 


ते पुढे म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नेहमीच सर्वात आधी प्राधान्य दिले आहे. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. अमरिंदर सिंह यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजयब सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तोमर पुढे म्हणाले की, भाजप हा असा पक्ष आहे, ज्यामध्ये नेहमीच अभिमानाने देश प्रथम आणि पक्ष दुसरा असल्याचे सांगितले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या आयुष्यात हे तत्व नेहमीच अंगीकारले. त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही सगळे एकत्र आहोत.


याच दरम्यान कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आज त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसवर नाराज होऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि पीएलसीची स्थापना केली होती.


भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. यावेळी अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, काँग्रेसच्या कार्यकाळात आपले सैन्य मजबूत झाले नाही. ए के अँटनी संरक्षण मंत्री असताना संरक्षण करार झाले नव्हते. अमरिंदर सिंह म्हणाले की, पंजाब हे भारताचे सीमावर्ती राज्य असल्याने याची स्वतःची वेगेळी आव्हाने आहेत.  याबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी सातत्याने चर्चा होत असून अलीकडे ड्रोनचा धोकाही वाढला आहे. यासोबतच पंजाबमध्येही अमली पदार्थांचे जाळे पसरले आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंह यांना भाजप पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किंवा राज्याचे राज्यपाल बनवले जाऊ शकते.


दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी जवळपास नऊ वर्षे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन आपला नवा पक्ष पीएलसी स्थापन केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन यांनी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. मात्र युतीला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. खुद्द अमरिंदर सिंह यांनाही त्यांची जागा वाचवता आली नाही.