नवी दिल्ली: भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या हे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात, तर मग कर्नाटकातील आमदार रवी सुब्रमण्य यांच्याशी तेजस्वी सूर्यांचा काय संबंध आहे याचा खुलासा त्यांनी करावा असा पलटवार खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं.
देशातील बेरोजगारीच्या विषयावर बोलताना खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले की, "देशात सध्या बेरोजगारीचा प्रश्न नाही आणि देशात जर कोणी बेरोजगार असेल तर ते काँग्रेस पक्षाचे प्रिन्स राहुल गांधी हे आहेत." काँग्रेसवर टीका करताना तेजस्वी सूर्या यांनी त्या पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला.
तेजस्वी सूर्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "कर्नाटकात रवी सुब्रमण्यम हे भाजपचे आमदार आहेत. तेजस्वी सूर्या त्यांना ओळखतात का आणि जर ते त्यांना ओळखत असतील तर त्यांच्याशी सूर्या यांचं नातं काय हेही सांगावे."
भाजपचे खासदार आणि भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे कर्नाटकातील भाजपचे आमदार रवी सुब्रमण्यम यांचे पुतणे आहेत.
तेजस्वी सूर्यांना असा प्रश्न विचारताना सुप्रिया सुळे यांनी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पूनम महाजन, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, रक्षा खडसे, हिना गावित यांचा दाखला दिला. खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, या सर्वांमध्ये आणि आपल्यामध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे राजकारणाची पार्श्वभूमी. मी ज्या राजकीय कुटुंबात जन्माला आले आहे त्याचा मला अभिमान आहे, मी ज्यांची मुलगी आहे त्यांचा मला अभिमान आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत यायच्या आधी भारतात उद्योग उभारले गेले नव्हते असं खासदार तेजस्वी सूर्यांनी लोकसभेत वक्तव्य केलं. त्यावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "तेजस्वी सूर्या ज्या ठिकाणाहून आलेले आहेत त्या बंगळुरुमध्ये विप्रो आणि इन्फोसिस सारख्या संस्था आहेत. आता देशभर लसीचे वितरण करणारी सीरम इन्स्टिट्यूट पुण्यात आहे."
संबंधित बातम्या: