नवी दिल्ली : विखे-पवारांच्या संघर्षाची झलक संसदेतही पाहायला मिळाली. संसदेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. यूपीए सरकारच्या कारभारावर सुजय विखे यांनी ताशेरे ओढल्यानंतर त्यावर सुप्रिया सुळेंनीही प्रत्युत्तर दिलं. 


त्याचं झालं असं की, सहकाराबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे, असं त्या म्हणाल्या. यूपीए सरकारमध्ये असताना सुजय विखे यांचे वडील मंत्री होते. त्यावेळी गांधी परिवाराशी ते भेटायचे. त्यावेळी जी धोरणं तयार केली गेली त्यात ते होते, त्यामुळं खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं मला माझी संस्कृती सांगते, असं सुळे म्हणाल्या.


यावेळी वयोश्री योजने बद्दल बोलताना अभिमानाने सुजय विखे सांगत होते. अहमदनगरमध्ये  मोदींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम करणार आहे. बाकीच्या खासदारांना योजनांची माहिती नसते असं विखे म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या त्या योजनेत देशातला कुठला जिल्हा अग्रेसर आहे याची आधी जरा माहिती घ्या.



संसदेबाहेर एबीपी माझाशी बोलताना विखे काय म्हणाले...


एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधताना खासदार सुजय विखे म्हणाले की, पंतप्रधान मोदींमुळेच साखर कारखाने टिकले.  पेट्रोल वरचा कर अनेक राज्यांनी कमी केला महाराष्ट्राने कमी केला नाही.  आर्थिक स्थितीमुळे महाराष्ट्राने घेतला नसेल मी समजू शकतो, पण वाईन साठी एवढी लगबग का? वाईनमध्ये अल्कोहोल नाही असं म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी ती पिऊन एकदा सरळ चालून दाखवावं, असं विखे म्हणाले. 


विखे म्हणाले की, सुप्रिया सुळे जेव्हा बोलत होत्या तेव्हा दुर्दैवाने मी लोकसभेत नव्हतो. वेळ येईल तेव्हा मी संसदेत उत्तर देईन. मी जे चार मुद्दे मांडले तुम्ही त्याला खोडून काढा. महाविकास आघाडी सरकारचे खासदार केंद्राच्या योजनांचे कार्यक्रम घेतात तेव्हा मोदींचे फोटो का नाही लावत. ज्या केंद्राच्या योजनांचा फायदा घेता किमान त्याचा उल्लेख करा. पस्तीस वर्षांचा निर्णय पस्तीस मिनीटात झाला याचा साक्षीदार मी आहे.  साखर उद्योगाबाबत युपीए आणि मोदी सरकारच्या निर्णयांची समोरासमोर बसून चर्चा करा साखर उद्योगाला आलेलं स्थैर्य केवळ मोदी सरकारच्या निर्णयामुळे आले आहे.  मोदींमुळेच साखर कारखाने टिकले. महाविकास आघाडीच्या अनेक खासदारांचे सहकारी कारखाने आहेत. किमान माणुसकीच्या नात्याने केंद्राने दिलेल्या लाभांचा उल्लेख करा, असं विखे म्हणाले.