अहमदनगर : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती उदयास आल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठी बंडखोरी होत असल्याचे दिसून येते. राज्यातील अनेक मतदारसंघात ज्या पक्षाला जागा सुटली, तेथील दुसऱ्या मित्र पक्षातील इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारीत आहेत. बहुतांश जिल्ह्यात अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत पक्षाच्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. आता, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यातही तेच पाहायला मिळत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. नगर शहराची जागा मविआतील राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. जिल्ह्याीतल नगर शहर विधानसभेची जागा विकल्याचा आरोप करत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खा. संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. संजय राऊत मुर्दाबाद, खाली मुंडक वर पाय... अशा घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांन जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. तसेच, आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे धुळे जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुखाने राजीनामा दिला आहे. 


महाविकास आघाडीच्यावतीने नगर शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभिषेक कळमकर यांना देण्यात आली आहे. वास्तविक नगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असताना देखील ही जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. त्यामुळे, उद्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार असून कार्यकर्त्यांचा विचार घेऊन दोघांचे उमेदवारी अर्ज मंगळवारी भरले जाणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय कायम ठेवल्यास शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचंही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले आहे.


संग्राम जगताप विद्यमान आमदार


अहमदनगरमधील शहर मध्यच्या जागेवर गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी विजय मिळवला होता. तर, 2014 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संग्राम जगताप यांना 49 हजार 376 मते मिळाली होती. तर, शिवसेनेच्या अनिल राठोड यांना 46 हजार 61 मते मिळाली होती, या निवडणुकीत राठोड यांचा पराभव झाला होता. त्यानंतर, 2019 च्या निवडणुकीत जगताप यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. जवळपास 11 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने संग्राम जगताप यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी बनल्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येथील जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. त्यामुळे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत येथून बंडखोरीचा इशारा दिलाय. 


धुळे जिल्ह्यातही राजीनामा


धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या जागा ही काँग्रेसला गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धुळे जिल्हा सह संपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी नाराजीतून अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे गेल्या 35 वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या हिलाल माळी यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे 2019 मध्ये आपल्याला धुळे शहर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली मात्र भाजपने त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार देऊन आपला पराभव केल्याचा आरोप हिलाल माळी यांनी केला आहे तर 2024 च्या  विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात संधी मिळेल अशी अपेक्षा असताना ही जागा काँग्रेसला गेल्याने पदरी निराशा आल्याने त्यातून आपण राजीनामा देत असल्याचे हिलाल माळी यांनी स्पष्ट सांगितले आहे या पत्रातून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागत आपण पदाचा आणि शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे