बीड : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रत्येक पराभूत उमेदवारांच्या पराभवाची कारणमिमांसा होत आहे. भाजपच्यावतीने (BJP) प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निरीक्षक जाऊन पराभवामागची कारणं शोधत आहेत. मराठवाड्यातील बहुतांश मतदारसंघात लोकसभा निवडणुकांच्या पराभवाचं कारण हे मनोज जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हेच असल्याचं अनेक नेते सांगत आहेत. तर, राज्यात अत्यंत चुरशीची ठरलेल्या बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव येथील जातीय समिकरणामुळेच झाल्याचं बोललं जात आहे. मराठा आंदोलनाचा फटका बीडमध्ये पंकजा मुंडेंना (Pankaja munde) बसल्याचं बोललं जातं. मात्र, पंकजा मुंडेंचा पराभव हा विकासकामांच्या मुद्द्यावर झाल्याचं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटलं होतं. आता, पंकजा मुंडेंवरील सुषमा अंधारेंच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
सगेसोयरे अंमलबजावणीस विरोध आणि ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी उपोषण केलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनास पंकजा मुंडेंनी वडगोद्री येथे जाऊन पाठिंबा दिला होता. त्यावेळी, ओबीसींच्या हक्काचं आरक्षण कसं जाणार नाही, हे सरकारने स्पष्ट करावं अशी मागणीही पंकजा यांनी केली होती. त्यामुळे, मनोज जरांगे हेच पंकजांच्या पराभवाचे कारण असल्यामुळे त्या ओबीसींच्या आंदोलनात सक्रीय झाल्याची चर्चा बीड जिल्ह्यातील काही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, पंकजा यांच्या पराभवाची कारणं शोधताना मराठा आणि वंजारी असा थेट संघर्ष निवडणूक काळात झाल्यामुळेच पंकजा यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरुन, सुषमा अंधारेंनी टीका करताना, पंकजा मुंडें भगिनींना टोला लगावला. पंकजा मुंडे ह्या ग्रामविकासमंत्री होत्या, तर प्रीतम मुंडे खासदार होत्या. मात्र, दोन्ही भगिनींनी बीड जिल्ह्यात काहीही विकास केला नाही, असे म्हटले. त्यावरुन आता भाजप आणि शिवसेनेत वाद रंगला आहे. भाजपच्यावतीने प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंवर पलटवार केला आहे.
भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला आहे. मुंबईहून तुम्ही ज्या रस्त्याने परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडे यांनी बनवला आहे, एवढेच नाही तर प्रीतम मुंडे यांनी दत्तक योजनेमध्ये जे पोहनेर गाव घेतले होते, त्या पोहनेरमध्ये कोणतेही विकास काम करायचे बाकी नाहीत. केवळ भाजपावर बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते, म्हणून पंकजा मुंडेंवर सुषमा अंधारे बोलत आहेत, अशा शब्दात कुलकर्णी यांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
"ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदानं राहणारे लोक आहेत. यांच्याआडून राजकीय पुढारी आपला राजकीय स्कोर सेटल करत आहेत, तो स्कोर सेट करणं प्रचंड वाईट आहे. लोकसभा निवडणूक जातीवादावर गेली नाही तर विकासावर गेली आहे. इथल्या प्रश्नावर चर्चा कोणी करणार आहे की नाही? आष्टी, पाटोदा या ठिकाणच्या मतदारांनी पंकजा मुंडे यांना मतदान केलंच नाही, त्यामुळेच निष्कारण त्याला जातीवादाचं रूप देणं चुकीचं आहे." पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर अनेक लोक बीडमध्ये म्हणतायेत की आता बीडचा विकास होणार नाही. त्यावर प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. आधी गोपीनाथ मुंडे, त्यानंतर प्रीतम मुंडे आणि प्रीतम मुंडेनंतर पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केले. या अगोदर विकास करण्यासाठी त्यांचे हात कोणी रोखले होते