अहमदनगर : प्रचाराची सभा होती भाजपचे उमेदवार सुजय विखेंची, पण भाषण सुरू केल्यानंतर बराच वेळ गेला तरी भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde) हे उमेदवाराचं नाव काही घेईनात. सुजय विखेंसाठी (Sujay Vikhe Patil) मतं मागण्याऐवजी राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्याच मागण्या सुरू केल्या. मग बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी सुजय विखे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं एका वाक्यात सांगून टाकलं. त्यामुळे सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातील सुप्त वाद अद्याप मिटला का नाही अशी चर्चा सुरू आहे. 


राज्यातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक म्हणजे अहमदनगर मतदारसंघ. नगरमध्ये यावेळी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत आहे. सुजय विखे यांना निलेश लंके यांच्यासोबत आता अंतर्गत विरोधकांनाही तोंड द्यावं लागत असल्याची चर्चा आहे. सुजय विखेंचं भाजपच्या ज्या नेत्यांशी पटत नाही त्यापैकी एक नेते म्हणजे राम शिंदे. 


राम शिंदेंकडून सुजय विखेंचा उल्लेख नाही


महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराला आले होते. त्यावेळी व्यासपीठावर महायुतीचे अनेक नेते उपस्थिती होते. भाजपचे राम शिंदे हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी भाषण सुरू केलं. भाषण सुरू होऊन बराच वेळ होऊन देखील राम शिंदे यांच्याकडून उमेदवार सुजय विखेंचा उल्लेख नाही. सुजय विखेंसाठी मतं मागण्यांऐवजी राम शिंदे यांच्याकडून फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या. 


त्यानंतर खाली सुरू झालेल्या चलबिचलनंतर राम शिंदे यांनी अखेर सुजय विखेंसबंधी भाष्य केलं तेही एका वाक्यात. ते म्हणाले की, कुणी काही बोलतं , पण मी भाजपचा निष्ठावंत आहे. साहेबांचा आदेश अंतिम असतो. माझ्यात आणि सुजय विखेंमध्ये कोणतंही भांडण नाही.


राम शिंदे म्हणाले की, 70 वर्षांनंतर कर्जतला देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मंत्री पदाची संधी दिली. राज्यात एखादा व्यक्ती विधानसभेत पडला तर त्याला विधानपरिषदेत संधी दिली तो म्हणजे एकमेव राम शिंदे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत हे लोकांना माहिती आहे. पण ते जलसंपदा मंत्री आहेत हे लोकांना माहिती नाही. कृष्णेचे पाणी भीमेत आणि भीमेचे पाणी कर्जतमध्ये आले पाहिजे. 


राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका


भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर काही लोक मेळावा घेतात. 25 हजार युवकांचा मेळावा त्यांनी घेतला. त्या मेळाव्यात कुणालाही रोजगार मिळाला नाही, कुणाला  लायसन्स मिळालं नाही. 


सुजय विखेंचा विजय पक्का, पण मला राम शिंदेदेखील हवेत


देवेंद्र फडणवीस यांच्याकडून "तुमचे लाडके नेते आणि माझेही लाडके नेते" असा राम शिंदे यांचा उल्लेख करण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. सुजय विखेंना मत देतोय, त्यावेळी आपण देशाच्या नेत्याला मत देत आहोत. देशाचा विकास कोण करू शकतो हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन सेना निर्माण झाल्यात. एकीकडे महायुती आहे दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाखिचडी आहे. त्यामुळे या ठिकाणी सुजय विखे यांचा विजय पक्का आहे. पण जिल्ह्यातून मला राम शिंदेदेखील हवे आहेत. 


राम शिंदे मी तुमचा बेरर चेक आहे, मी त्यावर सही केली आहे. जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना तुम्हाला मिळतील असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदेंना आश्वासन दिलं. 


ही बातमी वाचा: