BJP Presidential Candidate 2022: भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. याआधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि संसदीय मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.


बैठकीनंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजप आणि एनडीएने आपल्या सर्व घटक पक्षांसोबत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा केली. यानंतर द्रौपदी मुर्मू यांना एनडीएने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विरोधी पक्षांशीही सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला, परंतु यातून काही निष्पन्न झाले नाही. यूपीएने उमेदवार जाहीर केला आहे, असं ही ते म्हणाले.


माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून सिन्हा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर आता पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 29 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत असून, बीजेडी किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेससारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो.


या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी ट्वीट करत म्हणाले आहेत की, "लाखो लोकांना, विशेषत: ज्यांनी गरिबीचा अनुभव घेतला आहे आणि ज्यांनी संकटांचा सामना केला आहे, त्यांना द्रौपदी मुर्मूच्या जीवनातून मोठी शक्ती मिळते. धोरणात्मक बाबींची त्याची समज आणि दयाळू स्वभाव आपल्या देशाला खूप फायदेशीर ठरेल.''




 


संबंधित बातमी: 


Presidential Elections 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे उमेदवार, शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला निर्णय
Yashwant Sinha Profile: विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेले 'यशवंत सिन्हा' कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती