Presidential Elections 2022: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) या बैठकीला उपस्थित होते. अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव यांनीही बैठकीला हजेरी लावली.


या बैठकीला ओवेसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. मागील बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, गेल्या वेळी बोलावले नव्हते म्हणून ते आले नाहीत. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही (विरोधी पक्षांनी) एकमताने यशवंत सिन्हा हेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार असतील असा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बैठकीत सामील होण्यापूर्वी यशवंत यांनी ट्वीट केले होते की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, आता पक्ष सोडून मोठ्या उद्देशासाठी काम करण्याची वेळ आली आहे.


भाजपनेही बोलावली बैठक 


आज केंद्रातील भाजपनेही बैठक बोलावली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात भाजपने आज संध्याकाळी संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मंथन सभा असे नाव देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहू शकतात. यापूर्वी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर उमेदवाराच्या नावावर एकमत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.