मुंबई - राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लाईन लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये, धाराशिवमधील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar shivsena) यांनीही मोठं शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. धाराशिवमध्ये ओमराजेंनी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. माझ्या ओमदादासाठी मी आलोय, असे म्हणत आदित्य यांनी ळिलैनिरांती मने जिंकली. तसेच, आपल्या भाषणातून केंद्र सरकार आणि शिंदे सरकारवरही निशाणा साधला. यावेळी, अमित देशमुख (Amit Deshmukh Latur) यांनीही शेतकरी प्रश्नावरुन हल्लाबोल करताना, भाजपला लक्ष्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना चिमटा काढला.
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे म्हटले होते. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन भाजपाने सत्ता स्थापन केली. तर, राष्ट्रवादीतही फूट पाडून अजित पवारांना सत्तेत स्थान दिलं. त्यामुळे, शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत बसले. पण, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जागावाटपावरुन दोन्ही पक्षाचे नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, अद्यापही महायुतीमधील काही जागांचा तिढा सुटला नसून नाशिक, संभाजीनगर, ठाणे, कल्याण या जागांवरील उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे, भाजपाकडून राष्ट्रवादी अजित पवार व शिंदेंच्या शिवसेनेवर दबाव असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी धाराशिवमधील ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जासाठी जमलेल्या सभेत बोलताना भाजपला लक्ष्य केलं. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारांना टोला लगावला.
महाराष्ट्रात महायुतीत कोण कोणत्या पक्षात आहे, कोण कुणाचा अर्ज भरणार आहे, कोण कुणाचा प्रचार करणार आहे, कुणाच्या तिकीटावर कोण उभा राहणार आहे, हे काहीच कळायला मार्ग नाही. भाजपाने फोडाफोडीचं राजकारण केलं, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात माणूस फोडण्याचं काम केलं. एकही जिल्हा असा ठेवला नाही, जिथं त्यांनी माणूस फोडला नाही. महाराष्ट्रातील आजची राजकीय परिस्थिती फारच दयनीय आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना पक्ष फोडला. आपल्याला वाटत होतं की, भाजपाचा हा शरद पवारांविरुद्ध कट आहे, उद्धव ठाकरेंविरुद्ध कट आहे. पण, सध्या महायुतीत जो कारभार सुरू आहे, त्यावरुन भाजपाचा हा खरा कट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांच्याविरुद्ध असल्याचे वाटते, असे अमित देशमुख यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाने जे पक्ष खरे ठरवले ते कमी जागा लढत आहेत आणि जे पक्ष खोटे ठरवले ते जास्त जागा लढत आहेत. कालच एक सर्वेक्षण आमच्या हाती आलं, त्यानुसार महाविकास आघाडीची परिस्थिती भक्कम होत असून महाविकास आघाडीला ३९ तर महायुतीला केवळ ९ जागा मिळत असल्याचंही देशमुख यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, यावेळी अमित देशमुख यांनी धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून धाराशिवच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचं आश्वासनही धाराशिवकरांना दिलं.
आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा
धाराशिवमधील सभेत आदित्य ठाकरेंनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकार व राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळत नाहीत, शेतमालाला भाव नाही, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यामुळेच, धाराशिवची मशाल आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे, असेही आदित्य यांनी म्हटले. यावेळी, नाव न घेता शिवसेना शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला.लोकसभेची ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी आहे, ओमदादाही तिकडे जाऊ शकले असते, तेही गद्दारी करू शकले असते, त्यांच्यासोबत इंथ उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील. या वाघाने तर मिंध्यांच्या गाडीतून उद्धव ठाकरेंना फोन केला, मिंध्यांच्या गाडीला लाथ मारुन ते परत आल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले.दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंनी खेकड्याची नांगी तोडून काढणारच, असे म्हणत पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावरही टीका केली.