कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूरमध्ये (Kolhapur Loksabha) शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती. या सभेत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी मंडलिकांना मत म्हणजे थेट मला मत, असे सांगत कोल्हापूरवासियांना साद घातली होती. या सभेला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मोदींची सभा म्हणजे विजयाची 100 टक्के हमी असा समज रुढ असला तरी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक यांच्याबाबत कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत. त्यामुळे मोदींची सभा आटोपल्यानंतर लगेच मुंबईकडे न परतता एकनाथ शिंदे हे कोल्हापूरमध्येच थांबले होते.


एकनाथ शिंदे यांनी शनिवार रात्री कोल्हापूरमध्ये उशीरापर्यंत बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांना बोलावून त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबर बंद खोलीत जवळपास पाऊणतास चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी समरजितसिंह घाटगे यांच्याकडून कागलमधून संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा शब्द घेतला. 


कोल्हापूर लोकसभेत महायुतीची प्रचंड मोठी यंत्रणा आणि एकत्रित ताकद असली तरी शाहू महाराज यांच्याभोवतीचे वलय आणि त्यांचा करिष्मा कैकपटीने अधिक आहे. त्यांच्या पाठिशी काँग्रेसच्या सतेज पाटील यांचीही मोठी ताकद आहे. ही बाब एकनाथ शिंदे पूर्णपणे जाणून आहेत. परिणामी कोल्हापूरमध्ये मोदींची सभा होऊनही एकनाथ शिंदे हे निर्धास्त झालेले नाहीत. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे शनिवारी सकाळी कोल्हापूरच्या पंचशील हॉटेलमधील खोलीत तब्बल चार तास एकटेच बसून होते. या वेळेत एकनाथ शिंदे यांनी अनेकांशी फोनवरुन चर्चा केल्याचे समजते. 


आदित्य ठाकरेंची आज कोल्हापूरमध्ये सभा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आज आदित्य ठाकरे कोल्हापूरमध्ये येणार आहेत. आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी पाच वाजता ते हातकणंगले येथे सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतील. त्यानंतर रात्री आठ वाजता आदित्य ठाकरे हे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी हिंदमाता तालीम चौक, उचगावमध्ये सभा घेतील. या सभेत आदित्य ठाकरे मोदींच्या आरोपांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


आणखी वाचा


'शिवरायांचे वंशज, शाहू महाराजांविरोधात मोदी प्रचाराला येत आहेत हे राज्यातील जनता कधीच विसरणार नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल