नागपूर: दुभती काय जोपर्यंत दूध देतेय, तोपर्यंत तिला चारा खाऊ घालायचा. पण जेव्हा ही गाय दूध द्यायचं बंद करेल, तेव्हा तिला कसायाकडे पाठवायची तयारी सुरु होते, हे भाजप पक्षाचे धोरण आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबतही काहीसं असंच असावं, असे गंभीर वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अनिल देशमुख यांनी अजित पवार आणि भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य केले.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकताच शिखर बँक आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले की, मला तर असं वाटतंय की, हे सगळं षडयंत्र भाजपतर्फे सुरु असावे. 


विरोधातील नेत्याला आपल्याकडे घ्यायचं, त्यानंतर त्याच्यापाठी पुन्हा चौकशीचा ससेमिरी लावायचा, त्याला बदनाम करायचे. एकेका नेत्याला राजकारणातून कायमचा उठवण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसोय. 'दूध देनेवाली गाय जब तक दूध देती है, तब तक चारा खिलाते है,गाय दूध देना बंद कर देती है, तो उसको कसाई के पास भेजने की तयारी शुरु होती है", हे भाजपचं धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही तसंच होत असावं, हा माझा अंदाज असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगतिले.


सुनेत्रा पवारांचं मंत्रीपद राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न


यावेळी अनिल देशमुख यांना सुनेत्रा पवार यांच्या मंत्रि‍पदाबाबत प्रक्रिया विचारण्यात आली. त्यावर देशमुख यांनी बोलणे टाळले. हा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत अजित पवार किंवा प्रफुल पटेलच बोलू शकतील, असे देशमुख यांनी म्हटले.


भुजबळांच्या उमेदवारीबाबत अनिल देशमुख म्हणाले...


यावेळी अनिल देशमुख यांनी छगन भुजबळ यांच्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत हुकलेल्या संधीबाबत भाष्य केले.  मला आश्चर्य वाटते की, दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यावर छगन भुजबळ यांचे लोकसभेचे तिकीट कापले. आता राज्यसभेवरही त्यांना संधी दिली नाही, असे देशमुख यांनी म्हटले.


आणखी वाचा


अजित पवार यांना बाजूला करण्याचा भाजपचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य; दादांच्या कार्यकर्त्यांनाही सुनावलं