मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महायुतीमध्ये सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सगळ्या चर्चेत भाजपच्या अंतर्गत गोटात उमेदवारांच्या निवडीबाबत बराच खल सुरु आहे. भाजपकडून मुंबईत लोकसभेच्या एकूण 5 जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपकडून मुंबईतील लोकसभा उमेदवारांबाबत (BJP Loksabha Candidates) धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचे तिकीट कापले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यामध्ये आता ईशान्य मुंबईतील भाजप खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्या नावाची भर पडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी यांना बुधवारी दिल्लीतून भाजपश्रेष्ठींचा फोन आल्याचे समजते. त्यावेळी या दोन्ही खासदारांना तुम्हाला लोकसभेची उमेदवारी दिली जाणार नाही, याबाबत कल्पना देण्यात आल्याचे सांगितले जाते. तर पुनम महाजन यांच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाबाबत अद्याप सस्पेन्स आहे. याठिकाणी पुनम महाजनांची उमेदवारी कापून आशिष शेलार यांना रिंगणात उतरवण्याचा भाजप नेतृत्त्वाचा विचार आहे. परंतु, आशिष शेलार लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे समजते. त्यामुळे पुनम महाजन यांचे लोकसभेचे तिकीट कापले जाणार की नाही, याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. आशिष शेलार यांनी आपण उत्सुक नसून पूनम महाजनांना निवडून आणू असा विश्वास केंद्रीय नेतृत्त्वाला दिली असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल तर ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांच्या नावाची चर्चा आहे.


महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?


सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 7 जागा तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली, धाराशिव आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ येण्याची शक्यता आहे. तसेच, मित्र पक्षांकडून समाधानकारक जागा मिळत नसल्यामुळे दोनदा बैठक रद्द केल्यानंतर आता 30-7- 11 वर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा


भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची संभाव्य यादी, मुंबईत धक्कातंत्र, बड्या खासदारांचा पत्ता कट