जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद (Prasad Lad) लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. 


मराठा आरक्षणावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना जरांगे संतापले. ते म्हणाले की, हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला.


ठाण्याच्या एसपीला जाब विचारा 


मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं केल्याचा जाब प्रसाद लाड यांनी विचारावा असं म्हणत जरांगे म्हणाले की, ठाण्याच्या पोलिस भरतीत तिथल्या एसपीने कुणबी सर्टिफिकेट असलेल्या 400 ते 500 मुलांना बाहेर काढलं आणि ओपनमध्ये टाकलं. त्यावर प्रसाद लाडने देवेंद्र फडणवीसांना जाब विचारलं पाहिजे. ओपनमध्ये जा नाहीतर रिजेक्ट करतो अशी धमकी ठाण्याच्या एसपीने दिलीय. मग कशाला प्रमाणपत्र दिलंय? प्रमाणपत्र नसणाऱ्यांना आत घेताय. भंगार लोक आयएएस अधिकारी झालेत आणि प्रमाणपत्र असणाऱ्यांना बाहेर काढलं गेलं. तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर. माझ्या मुलांचं वाटोळं झालंय त्याचा जाब विचार. 


मुलींना शिक्षण मोफत जाहीर केलं, मग त्यात कशाला अटी घातल्या असा सवाल जरांगे यांनी विचारला. मोफत शिक्षणाची घोषणा केली तर ते विनाअट करा ना, त्यासाठी व्हॅलिडिटीची अट कशाला पाहिजे असं जरांगे म्हणाले.


मराठ्यांचे आमदार मराठ्यांवर घालू नका


मराठ्यांचे आमदार, मराठ्यांचे मंत्री मराठ्यांवर घालू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. ते म्हणाले की, तुम्हाला गोडीत सांगतोय, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावू नका, आता मराठे तुमच्याकडे निघतील. तुम्ही मराठ्यांच्या जीवावर मोठे झाला, आता मारामाऱ्या लावून मजा बघू नका. 


शांतता रॅलीमध्ये सर्वांनी सामील व्हावं


मनोज जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता राहिली पाहिजे, म्हणून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आता पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा ठरत आहे. 7 ऑगस्ट पासून सोलापूरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक दौरा होईल. सर्वांनी रॅलीसाठी काम बंद करून आपल्या जातीसाठी आणि लेकरासाठी यायचं आहे. व्यावसायिक नोकरदार मराठ्यांनी एक दिवस कामे बंद ठेवून मोठ्या संख्येने ताकद दाखवायची आहे. जिल्हा जिल्ह्यातील कोणत्याही मराठ्यांनी घरी राहायचं नाही. शहरातील मराठ्यांनी सहकुटुंब शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हा. 20 तारखेला मी आमरण उपोषणाला बसेणार आहे.