मुंबई: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. एवढेच नव्हे तर मुलगा भाषणासाठी व्यासपीठावर आला तेव्हा भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या या सभेची दखल त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या निलेश राणे यांनीही घेतली. काही दिवसांपूर्वीच निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुहागर येथील सभेत भास्कर जाधव यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती. परंतु, भास्कर जाधव यांचे आजचे भाषण ऐकून निलेश राणेही जुन्या आठवणींमुळे काहीसे हळवे होताना दिसले. एरवी विरोधकांवर कायम आक्रमक आणि बेछूटपणे टीका करणाऱ्या निलेश राणे यांचा हा अवतार अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार ठरला.


निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपल्या भावना मांडल्या. त्यांनी म्हटले की, भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा, तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत, त्या आम्ही आजही विसरलेलो नाही. पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुमच्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा. हा विचार करताना, 'मी कोण आहे' ही भावना बाजूला ठेवा, असा सल्ला निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिला.


उद्धव ठाकरे तुम्हाला मदत करणार नाहीत, हे आतातरी तुमच्या लक्षात आले असेल: निलेश राणे


निलेश राणे यांनी आपल्या व्हीडिओतून भास्कर जाधव यांना एक आवाहन केले. आतातरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोट बोलून फसवू नये. हे त्यांचे खोटे बोलायचे वय नाही. हे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचं राजकारण तसं राहिलेलं नाही. लोकांना आता खरं-खोटं समजतं. उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरुन घेणार, याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, असे तुम्हाला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. पण तुम्ही तुमच्याच दुनियेत मश्गूल असता, त्यामधून बाहेर पडा, असे निलेश राणे यांनी सांगितले.


फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा एकदा आत्मपरीक्षण करा: निलेश राणे


तुम्ही आजच्या भाषणात सहकाऱ्यांवर टीका केली. पण हे तुमच्याबद्दलच का होतं, इतर नेत्यांबाबत का होत नाही, याचा कधीतरी विचार करा. निलेश राणे चिपळूणमध्ये राहत नाही, तरी चिपळूणमधील सहकारी माझ्यासोबत सावलीसारखे असतात. आज इतकी वर्षे होऊनही त्यांनी माझी साथ सोडलेली नाही. पण तुम्ही चिपळूणमध्ये राहूनही तुमचे सहकारी तुम्हाला का सोडून गेले? तुम्हाला साथ द्यायला कोणीही तयार नाही. असं का होतंय, याचा विचार करा. फक्त दुसऱ्यांवर टीका करुन चालत नाही. तुम्ही चांगले, बाकी वाईट असे नसते. तुमच्या चुका काय, तुम्ही कितीजणांना वेठीला धरलं, तुम्ही कार्यकर्त्यांसाठी कितीवेळा उभे राहिलात, सहकाऱ्यांना कितीवेळा मदत केली, काय शब्द वापरलेत, या गोष्टींचाही विचार करा. आता तुमचं वय 70 च्या आसपास आहे. आता नाही तर कधी विचार करणार, असा सवाल निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना विचारला. 


आणखी वाचा


लेकाचं भाषण ऐकून भास्कर जाधव व्यासपीठावरच रडले, नेमकं काय घडलं?