मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Vaze) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचेही वाझेंनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  


भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, आज सचिन वाझेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते, हा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी त्यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. जे आरोप केले होते त्या आरोपांचा पुनरुच्चार पुन्हा एकदा सचिन वाझेंनी केला आहे. शंभर कोटीची वसुली, डान्सबारचे पैसे, मनसुख हिरेनची हत्या, अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचे काम सचिन वाझेंनी केले होते. सचिन वाझेंना अनिल देशमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा  आशीर्वाद होता. 


अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून चौकशी करावी


वाजेंना नोकरीत कोणी आणले? नोकरीत पुन्हा येण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या?  त्याला आशीर्वाद आशीर्वाद कुणाचा होता? हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे. त्यामुळे आज जो आरोप सचिन वाझेंनी केला आहे या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. त्याची सत्यता इनकॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे. यामध्ये वेळप्रसंगी अनिल देशमुख यांची बेल रद्द करून त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 


काय म्हणाले सचिन वाझे? 


एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सचिन वाझेंनी म्हटलं की, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव आहे, असे ते म्हणाले. 


आणखी वाचा 


Supriya Sule: 'ते शंभर कोटी रूपये..', वाझेंच्या देशमुखांवरील गंभीर आरोपावर अन् फडणवीसांना लिहलेल्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया