Nagpur News : राज्यात यशस्वी झाल्यावर जिल्हा परिषदेतही आता 'ऑपरेशन लोटस' भाजपकडून सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराजांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे सावधगिरी म्हणून कॉंग्रेसने सर्व सदस्यांना गुप्त ठिकाणी हलवल्याची माहिती आहे. दरम्यान नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीच्या सदस्याकडून सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर झालेल्या केदारांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी सोमवारी, 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीची सत्ता आहे. कॉंग्रेसकडे एकहाती बहुमत आहे. कॉंग्रेसमधील काही सदस्यांना पदाची अपेक्षा आहे. कॉंग्रेसकडून पदावर नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. एका महिला पदाधिकाऱ्याला पुन्हा सभापतीपद हवे आहेत. तर नाना कंभाले यांनी अध्यक्षपदाची इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसने आपल्या सदस्यांसह अपक्ष, शेकाप आणि गोंडवाणा गणतंत्र पक्षाच्या सदस्याला सहलीला पाठवले आहे. फक्त नाना कंभाले हे त्यांच्यासोबत नसल्याची माहिती आहे.
नाराजांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न
अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला. कॉंग्रेसमध्येही काही सदस्य नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या सदस्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या नेत्यांकडून नाना कंभाले यांना संपर्क साधण्यात आला. त्यांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांमधील इतर नाराजांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. एका गटातील सदस्य कंभाले यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला (BJP) जिल्हा परिषदेत 'ऑपरेशन लोटस'मध्ये किती यश येते, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
भाजपला एका नाराज गटाची आशा
सुनील केदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षासह एका सभापतीपदावर दावा केला होता. परंतु कॉंग्रेसकडून एक सभापतीपद देण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून उपाध्यक्षपदाची मागणी होत असल्याची माहिती आहे. परंतु याहीवेळी कॉंग्रेस एक पद देण्याच्या तयारीत नाही, अशी माहिती आहे. बैठकीत राष्ट्रवादीने महाविकास आघाडीसोबत असल्याचे आश्वासन दिल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीन गट आहेत. यातील दोन गट हे कॉंग्रेससोबत असल्याची चर्चा आहे. एक गट नाराज असून त्यांना भाजप आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात असल्याची जोरदार चर्चा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अंधेरी पोटनिवडणुकीत 25 उमेदवार रिंगणात, मुख्य लढत ऋतुजा लटके-मुरजी पटेल यांच्यात
Tomato Price : परतीच्या पावसामुळं टोमॅटोची आवक घटली, दरात 10 ते 15 रुपयांची वाढ