Maharashtra Political News : पुणे : अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवर (Maval Assembly Constituency) भाजपनं दावा सांगितला आहे. त्याअनुषंगानं दोन ऑगस्टला भाजपनं (BJP) मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. यामुळं अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत. ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला ती जागा सोडायची, असा महायुतीनं विधानसभेसाठी बेसिक फॉर्म्युला ठरवला आहे. मात्र, दुसरीकडे मावळ विधानसभेत भाजपनं शड्डू ठोकत, ही जागा कमळाच्या चिन्हावर लढवण्यासाठी आग्रह धरला आहे. यासाठी 2 ऑगस्टला मावळ भाजपकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळं आता मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा निर्माण होणार, हे उघड आहे. 


माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा 2 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मावळ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये पुढचे तीन दिवस बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून आमचा गावपातळीवर काम करणारा कार्यकर्ता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झालेला आहे. त्याला सक्रीय करुन येणाऱ्या काळात निवडणूक राज्यासाठी, महायुती म्हणून महत्त्वाची आहे. त्यासाठीच मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 


मावळमधून विधानसभेसाठी कुणाचा चेहरा? असं विचारल्यावर भाजप नेते बाळा भेगडे यांनी सांगितलं की, "आगामी विधानसभेसाठी मावळ मतदारसंघातून भाजपनं निवडणूक लढवावी, अशी मागणी आम्ही आमच्या नेत्यांकडे करणार आहोत. तसेच, यंदाच्या विधानसभेसाठी कमळ चिन्ह हाच आमचा चेहरा असेल."


मावळची जागा भाजपलाच मिळावी यासाठी प्रयत्न करणार : बाळा भेगडे 


संघर्ष हा विषय नाही, महायुतीचा निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं? हे लोकसभेला सर्वांना पाहिलं आहे. आमच्यासाठी महायुती सर्वकाही आहे. मावळ भाजपचा बालेकिल्ला आहे. हे यापूर्वी अनेक निवडणुकांच्या माध्यमांमधून सिद्ध झालेलं आहे. पुन्हा एकदा मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बळावर, जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी, असा आमचा प्रयत्न असेल, असंही बाळा भेगडे असं म्हणाले आहेत. 


मावळ भाजपचा परंपरागत मतदारसंघ : बाळा भेगडे 


"मावळ तालुक्याचा इतिहास पाहिला तर 1957 ला मावळ विधानसभेतून रामभाऊ म्हाळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आहे. 1957 ते 2024 या काळात सर्वाधिक वेळा जनसंघ, जनता पार्टी आणि भाजपचे आमदार जनतेनं निवडून दिले आहेत. संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा मतदारसंघ म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. त्यामुळे परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असलेला मावळ मतदारसंघ भाजपला मिळावा म्हणून आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाती मागणी करणार आहोत.", बाळा भेगडे म्हणाले आहेत.